Ram Satpute  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ram Satpute : मोहिते पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुतेंना फडणवीसांकडून आणखी बळ; भाजपकडून नवी जबाबदारी!

BJP State Executive Announced : गेली आठ महिन्यांची प्रतीक्षा संपली. भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर. रवींद्र चव्हाण यांची जम्बो टीम. राम सातपुते यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 24 February : गेली आठ महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली भारतीय जनता पक्षाची बहुचर्चित राज्य कार्यकारिणी अखेर आज (ता. 24 फेबुवारी) जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नव्या-जुन्यांचा मेळ घालत 43 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटलांच्या साम्राजाला टक्कर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक माजी आमदार राम सातपुते यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे सातपुते यांचे संघटनेतील ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 12 उपाध्यक्ष, 06 सरचिटणीस, 12 चिटणीस, कोषाध्यक्ष, मुख्य प्रवक्ता, मुख्यालय प्रभारी आणि विविध मोर्चांच्या अध्यक्षांचा समावेश असलेली राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना एकमेव संधी मिळाली आहे.

राम सातपुते यांच्याकडे राज्य चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या जबाबदारीमुळे भाजप (BJP) संघटनेत सातपुते यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. पुण्यातून काम पाहणारे सातपुते यांना 2019 मधील विधानसभा उमेदवारीची लॉटरी लागली.

मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला असल्यामुळे आणि त्यांचा गड मानल्या गेलेल्या माळशिरसमधून उमेदवारी मिळाल्यामुळे राम सातपुते हे पहिल्याच निवडणुकीत आमदार झाले. आमदार असतानाच त्यांच्यावर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

दरम्यान, पक्षाच्या आदेशानुसार सातपुते यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्या लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यात उभा संघर्ष सुरू झाला. लोकसभेतील पराभावानंतर सातपुते यांनी माळशिरसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या युतीला जोरदार टक्कर दिली. त्यांना अवघ्या काही हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला. मात्र, त्यांनी जानकर यांना दिलेली लढत लक्षवेधी ठरली. विधानसभेनंतर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक भाजपने सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढवली.

अकलूज नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजप उमदेवारांनी चांगली मते घेतली, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते ह्या दहिगाव गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. त्यामुळे मोहिते पाटलांना निकराने टक्कर देणाऱ्या सातपुते यांना राज्य कार्यकारिणीवर स्थान देत पक्षाने त्यांच्या पाठीशी ताकद उभी केल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT