

Dharashiv, 24 February : धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणाबाबत तोडगा निघाल्याची माहिती आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गटाला वगळून महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे धाराशिवमध्ये माजी मंत्री सावंत गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नव्या सत्ता वाटपच्या सूत्रानुसार सर्वाधिक १८ जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जाणार आहे, तर शिवसेनेकडे उपाध्यक्षपद जाणार असल्याची माहिती आहे. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषदेचे सभापतिपद दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे हा तोडगा लवकरच दृष्टीक्षेपात येण्याची चर्चा धाराशिवच्या (Dharashiv ) राजकीय वर्तुळात आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या एकूण 55 जागांपैकी सर्वाधिक 18 जागा भाजपने (BJP) जिंकल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेने 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 8, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 6, अपक्ष 4, काँग्रेस 3 आणि समाजवादी पक्षाने 1 जागा जिंकली आहे. सत्ता स्थापनेसाठी एकाही पक्षाला बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे महायुती एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याचे पुढे आले आहे.
भाजपकडून माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, त्यांच्या नावाला शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी पाटील गटाचा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपदाची ऑफर दिली होती. मात्र, शिवसेनेचा तो डावही असफल ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेसने आपण महायुतीलमधील भाजपसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नव्या घडामोडीनुसार महायुतीमधील तीनही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता समीकरण जुळविण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. मात्र, हे करताना भाजपने माजी मंत्री सावंत गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शिवसेनेतील एका गटाला सोबत घेऊन ही सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, तर शिवसेनेकडे उपाध्यक्षपद, तर संख्याबळानुसार जिल्हा परिषदेतील सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. आता त्याबाबतची घोषणा कधी होणार, ती कोण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.