Solapur, 02 December : माझा बाबा सिद्धिकी होण्याच्या अगोदर पुण्यातील गॅंगने माझ्या अपहरणाची दिलेल्या सुपारी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मुख्य सूत्रधाराचा मास्टर माईंडला अटक करावी. आपल्याला तातडीने पोलिस संरक्षण मिळावे, या मागणीसाठी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी आज (ता. ०२ डिसेंबर) सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन दिले.
विधानस निवडणुकीच्या धामधुमीत मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांचे अपहरण करण्याची सुपारी पुण्यातील एका गॅंगने दिली होती. त्यासंबंधीचे ऑडिओ रेकॉर्डिंग सर्वत्र व्हायरल झाले होते. पुण्यातील एका कुख्यात गॅंगने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मला पिस्तूल लावून अपहरण करण्याचा प्रयत्न आहे. मी यापूर्वी मोहोळ पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे, असे माजी आमदार कदम यांनी सांगितले.
दरम्यान, सोलापूर पोलिसांनी (Solapur Police) जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अजूनही मोकाट आहे. मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी आणि आपल्याला पोलिस संरक्षण मिळावे, यासाठी माजी आमदार रमेश कदम यांनी आज पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, मुंबईतील माजी आमदार बाबा सिद्धिकी यांना पोलिस संरक्षण होते. पाेलिस संरक्षण असताना केवळ पन्नास हजार रुपयांसाठी त्यांचा खून करण्यात आला आहे. सिद्धिकी यांच्या खून प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील तीन आरोपींना प्रत्येकी केवळ पन्नास पन्नास हजार रुपयांची रक्कम देऊन त्यांच्याकडून सिद्धिकी यांचा खून करवून घेण्यात आला, त्यामुळे माझादेखील बाबा सिद्धिकी होता कामा नये. तशी वेळ माझ्यावर येता कामा नये, अशी विनंती मी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांना केली आहे.
मोहोळच्या माझ्या जनसंपर्क कार्यालयात या अगोदरही दोन व्यक्ती आल्या होत्या. त्या दोन्ही व्यक्ती माझ्या कार्यालयात बसून रेकी करत होत्या. त्यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल मोहोळ पोलिसांना आढळून आले होते. त्या वेळी मोहोळ पोलिसांनी माझा जबाबही नोंदवून घेतलेला आहे. माझ्यासोबत दुसऱ्यांदा असा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली.
माजी आमदार कदम म्हणाले, माझा बाबा सिद्धिकी होण्याच्या अगोदर या धमकी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्या मुख्य सूत्रधारांचा मास्टर माईंडला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन मी सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना भेटून दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.