mangal prabhat lodha-Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Dispute News : फडणवीसांनी लोढांना सोलापूरला पाठवले; मात्र दोन्ही देशमुखांसह चार आमदारांची कोअर कमिटीच्या बैठकीलाच दांडी

Mangal Prabhat Lodha Solapur Tour : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीनुसार सोलापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. त्या बैठकीकडे दोन्ही देशमुखांसह पक्षाच्या चार आमदारांनी पाठ फिरविल्याचे पुढे आले आहे

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 June : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून असलेली नाराजी अजूनही कायम असल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीनुसार सोलापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. त्या बैठकीकडे दोन्ही देशमुखांसह पक्षाच्या चार आमदारांनी पाठ फिरविल्याचे पुढे आले आहे, त्यामुळे दोन्ही देशमुखांची भाजपच्या नेत्यांवर अजूनही नाराजी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या नाराजीचा सामना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यानंतर कौशल्य विकास मंत्री लोढा यांना करावा लागला आहे. मात्र ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही देशमुखांची नाराजी पक्षाला अडचणीत आणणारी ठरू शकते.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) निवडणुकीची धुरा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्याशी आघाडी करून पॅनेल उभे केले होते. त्या पॅनेलच्या विरोधात भाजपचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी पॅनेल उभे केले होते, त्या पॅनेलला विजयकुमार देशमुख यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता.

दोन्ही देशमुखांमध्ये टोकाचे मतभेद असतानाही बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याणशेट्टी यांच्या विरोधात हे दोन्ही आमदार एकत्र आले होते. मात्र, पक्षनेतृत्वाचा पाठिंबा कल्याणशेट्टी यांनाच असल्याचे बाजार समिती निवडणुकीच्या घडामोडीदरम्यान दिसून आले, त्यामुळे दोन्ही देशमुखांची नाराज वेळोवेळी पुढे आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २९ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्यातही दोन्ही देशमुख सहभागी झाले नव्हते. त्याबाबत बावनकुळे यांना पत्रकार परिषदेत जाहीरपणे खुलासा करावा लागला होता. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या बावनकुळे यांना केवळ निवेदने स्वीकारून माघारी परतावे लागले होते. दौरा संपवून विमानतळाकडे जात असताना बावनकुळे यांनी सुभाष देशमुख यांच्या घरी धावती भेट दिली होती.

बावनकुळे यांच्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्यात दोन्ही देशमुख सहभागी झाले नव्हते. चंद्रकांतदादांनी सकाळीच माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्यानंतरही देशमुखांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले.

भाजपच्या मंत्र्याला दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे नाशिक आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर मंगलप्रभात लोढा हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. लोढा यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सात रस्ता येथील एका खासगी हॉटेलमध्ये घेतली.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला आमदार देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, भाजपचे वरिष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आणि समाधान आवताडे हे अनुपस्थित होते.

मुंबईहून कोअर कमिटीची बैठक घेण्यासाठी आलेल्या लोढा यांच्या दौऱ्याकडेही भाजपच्या चार आमदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे आमदार सुभाष देशमुख यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका गारमेंट कारखान्यात जाऊन मंत्री लोढा यांची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, तर हेच देशमुख पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला मात्र अनुपस्थित होते. त्यावरून दोन्ही देशमुखांची नाराजी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.

फडणवीस ‘डॅमेज कंट्रोल’साठी सरसावले

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशमुखांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. दोन्ही देशमुखांची नाराजी दूर करण्यासाठी आता फडवणीस हे प्रयत्न करणार असल्याचे पुढे आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT