Solapur, 08 May : मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)-वळसंग या ८१.३७ किलोमीटर रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून ७४०.३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यावरून भाजपचे आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यात श्रेयवाद रंगला होता. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशमुखांना निधी मंजुरीचे पत्र पाठविल्याचे व्हायरल झाले होते. आमदार सुभाष देशमुख यांच्याप्रमाणे मला गडकरींचे पत्र मिळाले आहे. मात्र, मी ते मुद्दाम व्हायरल केले नाही, असा दावा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ वरील मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)-वळसंग या ८१.३७अ किलोमीटर रस्त्यासाठी ७४०.३८ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला होता. तसेच, आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) आणि सुभाष देशमुख यांनीही पाठपुराव्याचे पत्र सोशल मीडियातून व्हायरल केले होते. त्यावरून वाद रंगला होता.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी श्रेयवादावरून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना सुनावले आहे. ते म्हणाले, मोहोळ ते वळसंग महामार्गासाठी डीपीआरचा आदेश झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी कोणाचे तरी ऐकून रस्त्यासाठी निधी देण्याचे पत्र दिले आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळत नसल्याने एकीकडे त्या उपोषणाचा इशारा देता आणि दुसरीकडे माझ्यामुळे ७४० कोटींचा निधी मंजूर झाल्याच्या बाता मारता?, असा सवाल कल्याणशेट्टी यांनी केला आहे.
मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)-वळसं हा रस्ता माझ्या आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातून जातो. त्यामुळे आम्ही दोघांनीही या कामासाठी पाठपुरावा केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जसे आमदार देशमुख यांना पत्र दिले आहे, तसेच पत्र मलाही दिले आहे. आमदार देशमुख यांनी हे पत्र व्हायरल केल्यानंतर मी मुद्दाम हे पत्र व्हायरल करायचे टाळले, असेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात सलग १५ दिवस राहावं; म्हणजे सत्यपरिस्थिती त्यांच्या लक्षात येईल. सोलापुरात काँग्रेस पक्षाची वाट लागली आहे, तुमचे नगरसेवकही तुमच्यासोबत राहिलेले नाहीत. आमच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करून प्रणिती शिंदे या प्रसिद्धीच्या झोतात राहतात, असा आरोपही कल्याणशेट्टी यांनी केला.
राहुल गांधी हे देशपातळीवर काँग्रेस संपविण्याचे काम करत आहेत, त्याच पद्धतीचे काम प्रणिती शिंदे सोलापुरात करत आहेत. त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदे यांच्याविरोधात बोलू नये, असे आवाहनही कल्याणशेट्टी यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.