

Solapur, 04 May : केरळ विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडीची विजयाकडे घौडदौड सुरू आहे. काँग्रेस आघाडीने ९४ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहेत, दुसऱ्या क्रमांकवर डावे असून त्यांचे उमेदवार ४० ठिकाणी, तर भाजपचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत.
भारतीय जनता पक्षाने केरळमध्ये (Kerala) यंदा चांगलीच ताकद लावली होती. महाराष्ट्रातील ८७ नेत्यांना केरळमधील मतदारसंघाची जबाबदारी देत त्यांना प्रचारासाठी पाठविले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचा समावेश आहे. मात्र, या दोघांकडे जबाबदारी असलेल्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत, त्यामुळे कल्याणशेट्टी आणि सातपुते हे केरळच्या टेस्टमध्ये ‘फेल’ झाले आहेत.
आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांना कोट्टारक्करा विधानसभा मतदारसंघाचे, तर माजी आमदार राम सातपुते यांना नेडूमंगाड मतदारसंघाचे प्रभारी बनविण्यात आले होते. या नेत्यांनी त्या मतदारसंघात १५-१५ दिवस तळ ठोकून प्रचार केला होता. मात्र त्यात त्यांना यश येताना दिसत नाही.
आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे कोट्टारक्करा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे बी. एल. बालागोपाल हे आघाडीवर आहेत. त्यांना बाराव्या फेरीअखेर 53 हजार 408 मते मिळाली आहेत.
कोट्टारक्करा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे. या पक्षाच्या उमेदवार ॲड. पी. आयशा पॉटी यांना बाराव्या फेरीअखेर 51 हजार 255 मते मिळालेली आहेत. मतमोजणीच्या एकूण १५ फेऱ्या असून त्या पैकी १२ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या बाराव्या फेरीअखेर बालागोपाल हे 2153 मतांनी आघाडीवर आहेत.
याच मतदारसंघातून भाजपच्या कमळ चिन्हावर आर. रेशमी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. त्यांना बाराव्या फेरीअखेर 17हजार 431 मते मिळाली आहेत.
माजी आमदार राम सातपुते हे नेडूमंगाड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी होते. त्या मतदारसंघातही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जी. आर. अनिल हे आघाडीवर आहेत. त्यांना 56 हजार 485 मते १५ व्या फेरीअखेर मिळाली आहेत. काँग्रेस पक्षाचे मीननकल कुमार हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर भाजपचे उमेदवार युवराज गोकुळ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना १५ व्या फेरीअखेरपर्यंत 31 हजार 820 मते मिळाली आहेत.
नेडूमंगाड मतदारसंघाच्या मतमोजणीचे एकूण १८ फेऱ्या असून त्या पैकी १५ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या पंधराव्या फेरीअखेर अनिल हे 17 हजार 259 मतांनी आघाडीवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.