ZP Election politics : मागील पाच वर्षात खांद्याला खांदा लावून गोकुळ दूध संघात एकत्रित सत्ता भोगणाऱ्या कारभाऱ्यांनी आपल्या वारसदारांसाठी स्वतंत्र मार्ग निवडले आहेत. गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांसोबत राहणाऱ्या कारभाऱ्यांनी देखील झेडपीच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांची साथ धरली आहे. इतकेच नव्हे तर वारसदारांना झेडपीच्या रणांगणात उतरवले आहे. तर काही जणांनी स्वतः शड्डू ठोकला आहे. महायुतीतील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील अशा उमेदवारांना रेड कार्पेट टाकून कार्यकर्त्यांना ठेंगा दाखवला आहे.
जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या 'गोकुळ'मध्ये एकाच झेंड्याखाली काम करणारे काहीजण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र वेगवेगळ्या झेंड्याखाली रिंगणात उतरले आहेत. यात 2 संचालकांसह 4 संचालकांची मुले आणि एका संचालकाची पत्नी रिंगणात उतरली आहे. काँग्रेस, शिवसेना भाजप, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती, अशा सर्व पक्षांचे झेंडे घेऊन हे निवडणूक लढवत आहेत.
गोकुळ'च्या राजकरणातील गणिते जिल्ह्याचे राजकरण पाहून तयार होतात. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकीतील गणिते स्थानिक आघाडी पाहून मांडली जातात. येथे प्रत्येक उमेदवार परिस्थिती पाहून निर्णय घेतो. त्यामुळे सध्या 'गोकुळ'चे संचालक वेगवेगळ्या पक्षातून स्वतःचे, पत्नीचे, मुलांचे राजकारण करीत आहेत. काहीवेळा पक्ष महत्त्वाचे असतात, काहीवेळा स्थानिक आघाडी महत्त्वाची असते. अशीच परिस्थिती आज जिल्हा परिषदेत आहे.
स्थानिक आघाड्यांतून अनेक उमेदवार ठरले आहेत, पक्ष ठरले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेत आपल्या मुलाला किंवा मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी 'गोकुळ'च्या संचालकांनी पक्ष प्रवेश केला आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांची मुले जिल्हा परिषदेच्या रिंगणात पक्षाकडून उतरली आहेत. 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांची कन्या अमृता या राष्ट्रवादी अजित पवार पक्षातुन रिंगणात उतरल्या आहेत. यापूर्वी गोकुळच्या राजकरणातून डोंगळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तेव्हाच ही उमेदवारी निश्चित झाली होती.
'गोकुळ'चे माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांनीही घाईघाईने शिवसेनेत प्रवेश केला. यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रयत्न केले. या प्रवेशानंतर त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. याचसोबत स्वीकृत सदस्य मुरलीधर जाधव यांचे चिरंजीव शिवाजी जाधव यांनी शिवसेनेकडून, संचालक अंबरिशसिंह घाटगे यांची पत्नी सुयेशा भाजपकडून सिद्धनेर्ली मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत.
संचालक अंजना रेडेकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध रेडेकर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. ते शिवसेनेचे पदाधिकारी असतानाही त्यांना एबी फॉर्म मिळालेला नाही. शिवाय रेडेकर या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या गटातील आहे. त्यामुळे त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. याचसोबत पन्हाळा तालुक्यातील संचालक अमरसिंह पाटील हे अपक्ष रिंगणात उतरले असले, तरीही त्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाने पुरस्कृत केले आहेत. विद्यामान संचालक अभिजित तायशेटे हे काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.