Sangli, 08 March : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची चौकशी करून प्रशासक नेमण्यात यावा, या मागणीच्या आडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. सांगली जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून जतमधील सहकारी साखर कारखाना, सर्वोदय कारखाना जयंत पाटील यांनी कसा विकत घेतला. तसेच, कवठे महांकाळचा महाकाली कारखाना जयंत पाटील यांना कशासाठी घ्यायचा आहे, याचा इतिहासच गोपीचंद पडळकर यांनी मांडला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. बॅंकेच्या कामकाजात अनियमितात झाली असून कोणतेही तारण न घेता शंभर कोटी रुपयांपर्यंतची कर्जे देण्यात आलेली आहेत. त्यांची वसुलीही झालेली नाही. त्यातील काही कर्जे ही गंगाजळी टाकण्यात आली आहेत. सांगली जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत सहकारी संस्थांचे विक्रीकरण झालेले आहे. ह्या सहकारी संस्थांचे विक्रीकरण हे एका व्यक्तीच्या माध्यमातून झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे विक्रीकरण जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याभोवती केंद्रीत झालेले आहे. या विक्रीमध्ये जतच्या सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. जतमधील सहकारी साखर कारखान्याची अडीचशे एकर जमीन असून ती जत शहराला लागून आहे. पाच लाख रुपये गुंठा असा त्या जमिनीचा दर आहे. म्हणजे दोन कोटी रुपये एकराचा दर आहे आणि तो कारखाना जयंत पाटील यांनी अवघ्या चाळीस कोटी रुपयांमध्ये विकत घेतला आहे. तो जतचा कारखाना चांगला चालत होता. पण, जयंत पाटील यांनी तो ढापला, असा आरोपही पडळकर यांनी केला.
ते म्हणाले, भाजपचे माजी आमदार संभाजी पवार यांनी उभा केलेला सर्वोदय साखर कारखानाही जयंत पाटील यांनी ढापला आहे. कवठे महाकांळच्या महाकाली साखर कारखान्यावर १४० कोटी रुपये कर्ज आहे. सांगली जिल्हा बॅंकेने त्या कारखान्याला जमीन विक्रीसाठी परवानगी दिलेली आहे. त्या जमिनीचा रेट हा ३५ लाख रुपये गुंठा असा काढला आहे. या कारखान्याकडे २८० एकर जमीन आहे. पण, जयंत पाटील यांना जमीन विकून कर्ज फेडणे मान्य नाही.
जयंत पाटील यांनी पाच वर्षे कवठे महाकांळचा महाकाली हा कारखाना बंद पाडला. त्यांना तो विकत घ्यायचा आहे. जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांचा त्या कारखान्याच्या कॅम्पसमध्ये पुतळा आहे. तो रस्त्यावरून दिसत नाही. पण, नानासाहेब सगरे यांचा पुतळा रस्त्यावरून दिसतो. जयंत पाटील यांना तो राग असून त्यातूनच त्यांना कारखाना विकत घ्यायचा आहे, अशी त्यांची प्रवृत्ती आहे. हा कारखाना त्यांनी पाच-पन्नास कोटी रुपयांमध्ये पाहिजे, असा दावाही गोपीचंद पडळकर यांनी केला.
ते म्हणाले, आटपाडीचा माणगंगा साखर काखानाही विक्रीला काढला आहे, त्या कारखान्याकडे २२७ एकर जमीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून मी तो थांबवला आहे. आटपाडीची सूत गिरणीही दोन वर्षांपूर्वी विकली आहे. बॅंकेने ४० कोटींचा लिलाव जाहीर केला होता, ती सूतगिरणी अवघ्या ११ कोटी रुपयांना दिली आहे आणि ९९ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरून घेतली आहे. इथेच भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. एखादी गोष्ट ११ कोटींना खरेदी केली असेल तर ११ कोटींवर स्टॅम्प ड्यूटी भरायला पाहिजे, पण या सूत गिरणीची सरकारी किंमत ९९ कोटी दाखवण्यात आलेली आहे. त्या सूत गिरणीची जमीन दोनशे कोटी रुपयांना विकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.