Dr. Babasaheb Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Babasaheb Deshmukh : आमदार बाबासाहेब देशमुखांनी भूमिका केली स्पष्ट; ‘सांगोल्यातील पराभवाची जबाबदारी माझी, शेकाप कोणत्याही एका कुटुंबाचा नाही’

Sangola Nagar Parishad Election : सांगोला नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्ष कोणत्याही कुटुंबाचा नसून कार्यकर्त्यांचा निर्णयच आगामी भूमिकेचा आधार असेल, असे स्पष्ट केले.

दत्तात्रय खंडागळे

Sangola, 03 January : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच कार्यकर्त्यांसमोर गेले. कार्यकर्त्यांसमोर बोलताना ‘नगरपालिका निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माझी आहे’ असे स्पष्ट केले. तसेच, शेतकरी कामगार पक्ष हा कोणत्याही एका कुटुंबाचा नसून तो शेतकरी व कष्टकरी जनतेचा आहे. आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्ते जो निर्णय देतील, तीच पक्षाची भूमिका असणार आहे, असेही जाहीर केले.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना आमदार डॉ. देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नगरपालिका निवडणुकीत शेकापने जाहीर केलेले उमेदवार भाजप ऐनवेळी पळविला होते. शेकापने भाजपसोबत युती केली होती, त्यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुखांवर टीका झाली होती. त्यावर आमदारांनी भाष्य केले आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शेकाप (PWP Party) आघाडीला शहरात पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो. यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते, ज्या दिशेने निर्णय देतील, त्या दिशेने आघाडी अथवा स्वतंत्र निर्णय घेतला जाईल. (स्व) आबासाहेबांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव असून त्या विचाराला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असेही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कामगार पक्ष हा कोणत्याही एका कुटुंबाचा नसून तो शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा आहे. आगामी निवडणुकीबाबत पक्षाचे कार्यकर्ते जो निर्णय देतील, तोच निर्णय स्वीकारून त्याप्रमाणे भूमिका घेतली जाईल, असेही आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले.

सांगोला शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात आला आहे. यामध्ये शहरातील नागरी प्रश्नांसह चारा छावणीच्या प्रलंबित अनुदानाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. तो मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, सकाळ-संध्याकाळचे लोडशेडिंग बंद करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

विरोधकांचा राजकीय डाव मला समजतो : आमदार देशमुख

हमें पसंद है शांत रहना, इसे हमारी कमजोरी मत समझना, असे विरोधकांना सुनावत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी केली जात आहे. राजकीय टीका स्वीकार्य आहे. मात्र, वैयक्तिक व कुटुंबावर होणारी टीका मी कधीही सहन करणार नाही. विरोधकांचा राजकीय डाव मला समजतो. यापुढे माझ्या कुटुंबीयांचा व शेकापच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय अथवा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT