Sachin Sanap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sachin Sanap : उदय सामंतांचा ओएसडी राहिलेले सचिन सानपांचा मोठा दावा : ‘मी ज्यांना मानतो, त्यांचा मला आशीर्वाद...’

Pune Teachers constituency Election : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे निवडणूक लढवत असताना अपक्ष सचिन सानप यांनी शिंदे गटाचा शंभर टक्के पाठिंबा असल्याचा दावा केला. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय समन्वयाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur, 16 October : पुणे शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कौस्तुभ गावडे निवडणूक लढवत आहेत. मात्र, या मतदारसंघातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी राहिलेले सचिन सानप यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले सानप यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत मोठा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचा आपल्याला 100 टक्के पाठिंबा आहे. तसेच, मी ज्यांना मानतो, त्यांचा मला आशीर्वाद आहे,’ असा दावा सानप यांनी केल्याने महायुतीत संशयाचे धुके दाटू लागले आहे.

सचिन सानप म्हणाले, शिवसेना शिंदे गटाचा पुणे शिक्षक मतदार संघातून आपल्याला पाठिंबा आहे. माझ्या उमेदवारीमुळे शिक्षकांमधून उत्साह असून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रश्नांसाठी कोणीतरी मैदानात उतरला आहे, अशी त्यांची भूमिका आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची भूमिकाही कायमच शिक्षकांच्या हिताची आहे, त्यामुळे मी जो निर्णय घेतला आहे, त्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 100 टक्के आशीर्वाद आहे. मंगेश चिवटे यांचं काम खूप चांगलं आहे आणि त्यांनी या निवडणुकीत विचारपूर्वक माघार घेतलेली आहे. त्यांचंदेखील पाठबळ माझ्यासोबत आहे, हे तुम्हाला दिसूनच येईल, असा दावाही सानप यांनी केला आहे.

ते म्हणाले, निवडणुकीचा अर्ज भरण्याची तारीख ही 6 होती आणि महायुतीच्या उमेदवाराचे (कौस्तुभ गावडे) वय 3 तारखेला 30 वर्षे पूर्ण झालं आहे, त्यामुळे ही बाब आपण निदर्शनास आणावी आणि खरंच आपण एखादा संस्थाचालक निवडून द्यायचा की सामान्य शिक्षकांचा प्रतिनिधी निवडून द्यायचा, हे ठरवलं पाहिजे.

पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही शिक्षकांनी हातात घेतली असून आता ही निवडणूक संस्थाचालक विरुद्ध सामान्य शिक्षक अशी होणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या वतीने मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या एका नेत्याला विनंती केली नव्हती, असेही सानप यांनी म्हटले आहे.

सचिन सानप म्हणाले, जसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, त्याच पद्धतीने भाजपच्या नेत्यांनाही भेटलो. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी आमदार कपिल पाटील यांनाही भेटलो. बाळासाहेब आंबेडकर यांची तब्येत बरी नव्हती; म्हणून भेट झाली नाही, त्यांनाही भेटायचं होतं. या सर्व नेत्यांना भेटून ही निवडणूक शिक्षकांची आहे, त्यामुळे शिक्षकांना पाठिंबा द्या, अशी विनंती केली.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात मागील 7 वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचा माझ्यावर प्रभाव असणं यात काही गैर नाही. महायुती ही खूप मोठी गोष्ट असून त्यावर मी बोलावं एवढा मोठा मी नाही.

मी ज्यांना मानतो त्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि इतर पक्षांतील लोकांचाही मला आशीर्वाद असू शकतो. निकालादिवशी शिक्षकांचा आवाज म्हणून पुढे आलेला सचिन सानप हा तुम्हाला विधान परिषदेचा सदस्य झालेला दिसेल, असा दावाही सानप यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT