

Solapur, 15 October : देशाचा डीएनए हा संविधन मानणारा आहे, हाच डीएनए या सरकारला बदलायचा आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कट्टर विचारसरणी मतदान प्रक्रियेत आणून हा डीएनए बदलायचा आहे. या देशात केवळ भाजपच्या विचारसरणीमुळे इंजिनियर, वकील होणार नाहीत, तर पाकिस्तानसारखे कट्टर अतिरेकी तयार होतील, असे खळबळजनक विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
दरम्यान, तडीपार आणि व्होटचोर या दोघांच्या प्रेशरमुळे फॉर्म 6 बदल केले आहेत. तुमचं नाव यादीतून कट झालं तर देशात नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ तुमच्यावर येईल. आता नाही तर कधी लढणार? रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची वेळ आहे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत खासदार शिंदे बोलत होत्या. त्यात म्हणाल्या, देशात कधी नव्हे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटिशांविरोधात आपल्याला लढ्याला संधी मिळाली नाही. पण, लोकशाही जिवंत ठेवण्याची संधी आपल्याकडे आहे.
क्रांतीसाठी मतदानाची संधी ही आपल्याला मिळाली आहे, लोकशाही खंबीर ठेवण्यासाठी हे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे मतदान आहे. देशात जी स्थिती आहे, ती पाहता आज प्रचाराची गरज आहे काय? अहंकारी सत्ताधाऱ्याला धडा शिकवायचं असेल तर ही संधी आहे. बॅलेट पेपरवर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे आपण दाखवून दिलं नाही तर मग आंदोलनाचा काय फायदा आहे? असेही त्यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या, अमित शाह म्हणतात 2029 मध्ये आम्हीच जिंकू, हा आत्मविश्वास त्यांच्यात कसा आला? ज्ञानेश कुमारला वाचवण्यासाठी इवढे प्रयत्न करतायत, जेवढे धर्मेंद्र प्रधानांसाठीसुद्धा यांनी केले नाहीत. त्यामुळे ‘दाल में कुछ काला नाही; संपूर्ण दाल काळी आहे.’
देशातील 13 कोटी मतदार ज्ञानेशकुमार यांनी कमी केले आहेत, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. फॉर्म 6 मध्ये जे बदल केले, त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्य सचिव यांचे नावसुद्धा कट होण्याची शक्यता आहे, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवलं.
त्या म्हणाल्या, या लोकांनी देशात तिरंगा फडकवला नाही आणि दिल्लीत तिरंगा फडकवणाऱ्यासुद्धा यांनी अटक केली. तब लढे थे गोरोंसे अब लढ रहे है चोरोंसे. आपली लढाई ही पुरोगामी विचारसरणी टिकवण्यासाठी आहे. कितीही पैशाचा वापर त्यांनी केला तर आता त्यांचं काही होणार नाही. देशात आता एक चळवळ निर्माण झाली आहे. ही चळवळ बघून स्वातंत्र्य काळाची आठवण येते.
या देशाचे जे नुकसान होतंय, ते भरून काढायला किमान 50 वर्षे लागतील. या देशाचे वाटोळे करण्याचे पाप मोदी आणि शाह करत आहेत. आम्हीही सत्तेत होतो, आमच्याविरोधातही आंदोलन झाली. पण, त्यांच्यासारखे आम्ही त्यावेळी आंदोलकांना अटक केली नाही. त्यांना आंदोलन होऊ द्यायचे नाही. ‘जंतरमंतर’ वर यापुढे आंदोलन होणार नाही, मग ही हुकूमशाही नाही तर काय आहे? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.