Subhash Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Subhash Deshmukh : ‘काँग्रेसमधील घरभेद्यांमुळे मी अनेक निवडणुका जिंकल्यात; मोहिते पाटील पक्षात आले, तेव्हाही खूप त्रास दिला’

Solapur BJP News : भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना घरभेदींपासून सावध राहण्याचा सल्ला देत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षएकतेवर भर दिला.

सरकारनामा ब्यूरो
  1. सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षातील ‘इनकमिंग’ आणि घरभेद्यांवर तीव्र शब्दांत टीका करत कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला.

  2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंत, पक्षपरंपरेतील कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी आणि ग्वाही मेळाव्यात देण्यात आली.

  3. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व इतर नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Solapur, 23 December : काँग्रेस पक्षामधील घरभेद्यांमुळे मी अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यावर बाहेरून आलेले स्वभावाप्रमाणे घरभेदी होतील. दगा देणारा साप स्वभाव कधीही सोडत नाही. त्यांच्यापासून दूर राहा. मोहिते-पाटील भाजपमध्ये आले, तेव्हाही खूप त्रास दिला गेला, सध्याचा त्रास त्यापुढे काही नाही, त्यामुळे हेही दिवस जातील, शांत राहा, असा सल्ला सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शहरातील राजस्व नगरमध्ये झाला. त्या मेळाव्यात आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी भाजपमधील इनकमिंगवर प्रहार केला. कडाडून विरोध करूनही माजी आमदार दिलीप माने यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्यावरून सुभाष देशमुखांनी नाराजी व्यक्त करताना नाव न घेता अनेक टोले लगावले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकिट देताना तो कार्यकर्ता भाजपच्या (BJP) परंपरेतील असावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर बोलताना ‘जनता जागरूक आहे; नेत्यांनी दिवसा एक आणि रात्री एक करू नये, ते फार दिवस टिकणार नाही. तसेच, बाहेरून आलेल्या घरभेद्यांपासून सावध राहा, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले.

आमदार देशमुख म्हणाले, नेते एकीकडे असले तरी जनता जागृत आहे, हे नगरपालिका निवडणुकीत दिसले आहे. पंधरा जागा मिळणार म्हणणाऱ्यांना भाजप समजला नाही. त्यांच्या अपप्रचारावर विश्‍वास ठेवू नका. निवडणुका झाल्यावर त्यांना आपण स्वतः पक्ष कार्यालयात घेऊन येऊ. मी कधीही गावांत भांडणे लावली नाहीत. लोक गुण्यागोविंदाने राहावेत, यासाठी प्रयत्न केले आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या बोगस सोसायट्या असतानाही आपल्या पॅनेलला ४८० मते मिळाली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्यांनी इतरांची नाराजी दूर करावी, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.

शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, असुरक्षित न वाटून घेऊ नका, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. चलबिचल होऊ नका, कोणी येवो-जावो निष्ठावंतांनाच, सामाजिक कार्य करणारे आणि घरात घेण्याच्या लायकीचा उमेदवार आगामी निवडणुकीत देणार आहे, अशी ग्वाही शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली.

निष्क्रीय नगरसेवकांना उमेदवारी देणार नाही. घाबरू नका, कोणीही आले गेले तरी निष्ठावंतांना उमेदवारी मिळेल. दुसऱ्या प्रभागात संधी दिली तरी लढा, पक्षादेश पाळा, अशी सूचनाही शहराध्यक्षांनी कार्यकर्त्यांना केली.

चोरून पक्षप्रवेश झाला : कोरके

आपल्या विरोधामुळे प्रवेशाला थोडासा का होईना ब्रेक लागला. मात्र, चोरून का होईना प्रवेश झाला. भाजप वटवृक्ष असून लोकोपयोगी आहे. 'इनकमिंग' मुळे निर्माण झालेल्या स्पर्धेतही पक्षाची शिस्त सांभाळून काम करा. निष्ठावंतांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा कोरके यांनी मेळाव्यात केली.

आम्हाला शिकवू नका : विशाल गायकवाड

आता तुमचे काही खरे नाही, सगळे आम्हीच, असा अपप्रचार सध्या सुरू आहे. पण येतील बहू, जातील बहू त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मागून येऊन आम्हाला शिकवू नका, भीतीही दाखवू नका, असा टोला सोलापूर भाजपचे माजी सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी विरोधकांना लगावला.

प्र.1: सुभाष देशमुख यांनी कोणावर टीका केली?
उ: भाजपमध्ये बाहेरून आलेल्या ‘इनकमिंग’ नेत्यांवर आणि घरभेद्यांवर टीका केली.

प्र.2: कार्यकर्त्यांना त्यांनी काय सल्ला दिला?
उ: घरभेद्यांपासून सावध राहा आणि शांतपणे पक्षासाठी काम करत राहा, असा सल्ला दिला.

प्र.3: उमेदवारीबाबत काय भूमिका मांडली गेली?
उ: भाजपच्या परंपरेतील निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी, असे सांगण्यात आले.

प्र.4: शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी काय ग्वाही दिली?
उ: निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही आणि योग्य उमेदवारच निवडणुकीत दिले जातील, अशी ग्वाही दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT