

चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना–भाजप महायुतीने एकहाती सत्ता मिळवत मोठा विजय मिळवला.
नगराध्यक्षपदी युतीचे उमेश सकपाळ मोठ्या फरकाने विजयी झाले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीही हाच पॅटर्न राहील, असे सांगत अजित पवार गटासाठी महायुतीचे दरवाजे बंद असल्याचे संकेत दिले.
Ratnagiri News : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर होताच येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. जिल्ह्यातील सात ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-शिवसेना युती दिसली. पण या पालिकेच्या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. ज्यामुळे येथे आत्मपरिक्षण करण्याची आता वेळ येथील आमदार शेखर निकम यांच्यावर आली आहे. अशातच जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी घोषणा होण्यापूर्वीच मोर्चे बांधणीला वेग आल्याचे दिसत आहे. पण याही निवडणुकीत दादांच्या राष्ट्रवादीला महायुतीत ‘नो एन्ट्री’ असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. यामुळे येथील युतीत राष्ट्रवादीला घेणार नाही असेच स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे. यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
एकीकडे राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत जोरदार चर्चा रंगली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवत याला विरोध केला आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे ज्या महायुतीत जावून अजितदादांनी सत्तेच्या रथात बसणे पसंत केले आहे. त्याच रथावर स्वार असणाऱ्या शिवसेनेकडून मात्र आता त्यांना विरोध होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत नुकताच चिपळूणमध्ये वक्तव्य केलं आहे. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उदय सामंत यांनी चिपळुणातील युतीच्या मेळाव्यात, चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची फसवणूक केली नाही. शिवसेना भाजप युतीने निवडणुकीला सामोरे गेलो आणि एकहाती यश मिळाले. नगराध्यक्षपदी युतीचे उमेश सकपाळ मोठ्या फरकाने विजयी झाले. आता हाच पॅटर्न जिल्ह्यात राबवला जाईल, असे सांगत महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने १६ जागा जिंकत सत्ता काबीज केली. या पार्श्वभूमीवर युतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी अतिथी सभागृहात करण्यात आला. यावेळी सामंत बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळाले. राजापुरात थोड्याशा फरकाने जागा गेल्या; परंतु तेथे गतवेळच्या तुलनेत नगरसेवकांची संख्या वाढली आहे. उर्वरित रत्नागिरी, लांजा, देवरूख, चिपळूण, गुहागर आणि खेडमध्ये युतीला मोठे यश मिळाले. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत युती व्हावी, अशी आमचीही इच्छा होती; मात्र ते ठरावीक जागांवर अडून बसल्याने महायुती झाली नाही.
शिवसेना-भाजप युतीला निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे हाच पॅटर्न आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राबवला जाईल. जिल्ह्यातील महायुतीबाबत आपण योग्य निर्णय घेऊ. रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिले तरी त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. चिपळुणात पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा जाहीरपणे दिलाच आहे. आता त्यांना महायुतीचे दरवाजे बंद असतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
कोणी फसवले हे दाखवून दिले
शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण म्हणाले, ‘चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत कोणी कोणाला फसवले, हे मतदारांनी दाखवून दिले आहे. ज्या जागांवर राष्ट्रवादी अडून बसली तेथील राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले. यातून त्यांनी बोध घ्यायला हवा. या निवडणुकीत युती म्हणून योग्य नियोजन केल्याने यश मिळाले आहे. मतदारांनी युतीवर जो विश्वास टाकला तो सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. चिपळूण शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी आपले प्रयत्न असतील.
1. चिपळूण नगरपालिकेची सत्ता कोणाकडे गेली?
शिवसेना–भाजप महायुतीकडे एकहाती सत्ता गेली आहे.
2. नगराध्यक्षपदी कोण निवडून आले?
महायुतीचे उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विजयी झाले.
3. अजित पवार गटाबाबत उदय सामंत यांनी काय संकेत दिले?
महायुतीत अजित पवार गटासाठी दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
4. पुढील निवडणुकांसाठी कोणता पॅटर्न राबवला जाणार?
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीही शिवसेना–भाजप युतीचा हाच पॅटर्न राहणार आहे.
5. या निकालाचा राजकीय अर्थ काय आहे?
रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अधिक आक्रमक होत असून राष्ट्रवादी अजित पवार गट अडचणीत आल्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.