Mumbai, 14 December : आगामी काळात मी स्वतः कधीही ईव्हीएम मशीनवर मतदान करणार नाही. ईव्हीएम मशीन असेल तर निवडणुकीलाही उभे राहणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी केली आहे. जानकर यांच्या या घोषणेमुळे ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडीची लढाई तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर निवडून आलेल्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावाने ईव्हीएमवर (EVM Machine) संशय घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र, सोलापूर जिल्हा प्रशासनाने मारकडवाडी ग्रामस्थांना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर मारकडवाडीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
आमची पुढची वाटचाल फार वेगवान असणार आहे, ती या देशाला आणि राज्याला दिशा देणारी ठरणार आहे. मारकडवाडी हे ईव्हीएमविरोधातील भूकंपाचे मुख्य केंद्र असणार आहे. ज्या प्रमाणे पोखरण हे अणुशक्ती चाचणीचे केंद्र होतं, तसं मारकवाडी हे लोकशाही आणि बॅलेट पेपर मतदानाचे केंद्र होणार आहे, असा दावा जानकर यांनी केला.
आमचं निवडणूक आयोग आणि सरकारला सांगणं आहे की, तुम्ही सामोरे या. आमच्याशी चर्चा करा, आम्ही तुम्हाला लिखित स्वरूपातील सामान्य लोकांची ॲफिडेव्हिट देणार आहोत. तुमच्याकडे ईव्हीएम मशीनमध्ये जी काही हेराफेरी झाली आहे, त्याचे पुरावे आम्ही सादर करणार आहोत. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने काही पाऊले उचलली नाहीत, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, याचीही जानकरांनी पुनरुच्चार केला.
आमची सरकार आणि निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की, आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करायचे आहे. पण, ईव्हीएमसाठीच तुमचा आग्रह का आहे. ज्यांना ईव्हीएम पाहिजे, त्यांना ईव्हीएम द्या आणि ज्यांना बॅलेट पेपर पाहिजे त्यांना बॅलेट द्यावा, असे आवाहनही जानकर यांनी केले.
आमदार जानकर म्हणाले, हा संतांचा महाराष्ट्राचा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम आणि आमच्या विठ्ठलाचा, पांडुरंगाचा महाराष्ट्र आहे. आम्हाला च्वॉईस दिला पाहिजे की व्हेज खायचे की नॉनव्हेज खायचे. ज्यांना नॉनव्हेज खायचे आहे, त्यांना नॉनव्हेज द्या. पण आम्हाला व्हेज खायचे आहे. आम्हाला आमचं मत गेलं कुठं हे बघायचं आहे, त्यासाठी निवडूक आयोगाने ईव्हीएमबरोबर बॅलेट पेपरही दिला पाहिजे. ही मागणी घेऊन नव्हे तर ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही उतरलो आहोत, एवढंच मी निवडणूक आयोग आणि सरकारला सांगू इच्छितो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.