
Solapur, 14 December : ईव्हीएमच्या विरोधात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीने राज्यात प्रथम आवाज उठविला होता. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. आता याच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायातीने ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव केला आहे. सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना ईव्हीएमवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
लक्ष्मी टाकळीचे सरपंच संजय साठे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या एकूण 15 सदस्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना ईव्हीएम वापराबाबतचे निवेदन दिले आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मारकडवाडीच्या (Markadwadi) माध्यमातून ‘ईव्हीएम’वर संशय घेऊन विरोध होत असताना त्याच जिल्ह्यात ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव केला जात आहे, त्यामुळे सोलापुरात ईव्हीएमवरून जोरदार वादंग उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लक्ष्मी टाकळीचे सरपंच साठे यांनी याबाबत माहिती दिली की, राज्यात आणि देशात सध्या ईव्हीएमच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव केला आहे. लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने बारा डिसेंबर रोजी सर्व पंधरा सदस्यांच्या उपस्थितांमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ एकमताने ठराव पास केला आहे.
सोलापूरच्या जिल्हा प्रशासानाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत चोखपणे काम केले आहे. चांगले काम करणाऱ्या प्रशासनावर गालबोट लावण्याचे काम केले जात आहे; म्हणून आम्ही ईव्हीएमला पाठिंबा देणारा ठराव एकमताने मंजूर केला आहे. ईव्हीएमवर त्यांना (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला) शंका असेल तर एकाच पक्षाचे चार चार आमदार निवडून आले आहेत ना, असा सवालही सरपंच साठे यांनी केला.
ते म्हणाले, आगामी काळातील सर्व निवडणुकांचे मतदान हे ईव्हीएम मशीनवरच घेण्यात यावे. ईव्हीएमवर होणारे मतदान हे पारदर्शक आहे. वंचित लोकांनाही या ईव्हीएम मशीनमुळे न्याय मिळतो. मशीनपुढे गुंडागर्दी, दादागिरी चालत नाही, ईव्हीएममुळे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतो, त्यामुळे मतदानासाठी ईव्हीएम मशीन कायम ठेवावी, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वार केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.