kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर (बिद्री) कारखान्याची निवडणूक अत्यंत तुल्यबळ होत चालली आहे. निवडणूक कारखान्याची असली तरी आगामी विधानसभेची फाइट या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. चार तालुक्यांत पसरलेला कारखान्याचा विस्तार आणि तीन विधानसभा मतदारसंघात सुरू झालेली ईर्ष्याची चुरस आतापासूनच वाढत चालली आहे. राधानगरी-भुदरगड-आजरा, कागल, करवीर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी या कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आमने सामने आले आहेत. (In the Bidri Sugar factory elections, rivals of assembly came to face each other)
कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना, कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या वेळी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतच आमदार, खासदार आणि मंत्र्यांची ताकद पणाला लागत आहे. कारखान्याच्या निवडणुकीतच विधानसभेचे गणित अवलंबून असल्याने कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक यांचा सामना रंगला होता. सध्या सुरू असलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्ध्यांमध्ये राजकीय चुरस रंगली आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात आतापासूनच राजकीय ईर्ष्या पाहायला मिळत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत चेअरमन के. पी. पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे, तर आमदार प्रकाश आबिटडकर यांच्या आघाडीच्या प्रचाराची धुरा भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी खांद्यावर घेतली आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात कागल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होण्याची शक्यता आहे. या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने यांच्यातील लिटमस् टेस्ट सुरू आहे.
राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील हे प्रतिस्पर्धी सध्यातरी उमेदवार म्हणून आहेत. कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने तेही आमने सामने आले आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पारंपरिक राजकीय विरोधक आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचे नेतृत्व हाती घेतले आहे.
महाडिक यांचे बंधू अमल महाडिक हे दक्षिणचे भाजपचे संभाव्य उमेदवार मानले जातात. सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत बिद्री कारखान्याची असली तर फाइट विधानसभेच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत आहे, हे मात्र नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.