Satara News : कोयना धरणातील पाणसाठ्याबाबत सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांना संपूर्ण माहिती नाही. खासदार पाटील यांनी केलेल्या विधानाचा मला खेद वाटला. मी उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. त्यांच्याकडे संजयकाकांच्या वक्तव्याबाबतची माझी नाराजी बोलून दाखविणार आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. (Koyna water issue : Shambhuraj Desai upset over Sanjay Patil's statement)
कोयना धरणातून पाणी सोडण्यावरून सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे खासदार संजय पाटील आमने सामने आले आहेत. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाद सुरू आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातही पाणी पेटण्याची चिन्हे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत साताराचे पालकमंत्री देसाई आडमुठेपणा करत आहेत. कोयना धरणातील पाणी आमच्या हक्काचे आहे. ते दान किंवा भीक देत नाहीत. सांगली जिल्ह्याच्या आत्मसन्मानाला ठेच लावण्याचा प्रयत्न यापुढे खपवून घेणार नाही. वेळ आली तर खासदारकी पणाला लावू, राजीनामा देऊ, इशारा खासदार संजय पाटील यांनी दिला होता. त्यावर देसाई यांनी आज प्रतिक्रिया दिली.
देसाई यांनी सांगितले की, खासदार संजय पाटील यांच्याकडे कोयना धरणातील जलसाठ्याची संपूर्ण माहिती नाही. त्यामुळे ते असे बोलत आहेत. गेल्या वर्षी तुलनेत आज कोयना धरणात २७ टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा आपल्याला जुलै-२०२४ पर्यंत पुरवायचा आहे. संजय पाटील म्हणतात की सांगलीवर अन्याय होतो आहे. पण महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री म्हणून राज्याचे हित डोळ्यासमोर ठेवूनच मंत्र्याला काम करावे लागते. मी जरा सातारा जिल्ह्यातील असलो आणि संजय पाटील हे सांगलीतील असले तरी मंत्री म्हणून आम्हाला संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवूनच काम करावं लागतं.
कोयना धरणातील ६७ टक्के पाणी हे मूळतः वीजनिर्मितीसाठी आहे. कोयनेवर हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. धरणातील ३३ टक्के पाणी हे शेती, पिण्यासाठी आणि उद्योगासाठी आहे. धरणातील पाणीसाठ्याचा मी तीन ते चार वेळा आढावा घेतला आहे. तरीसुद्धा आमदार अनिल बाबर यांचा मला आणि मुख्यमंत्र्यांना खूप आग्रह होता. त्यामुळे अत्यंत टंचाईची परिस्थती आहे, त्यामुळे तात्पुरत पाणी कसं सोडता येईल, हे बघा, असं मला मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानंतर मी माझ्या अधिकारात दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
कोणाच्या ७ /१२ वर कोयनेचे धरण नाही, असे संजय पाटील म्हणाले, त्याचा मला खेद वाटला. हे मान्य आहे की, ते भाजपचे खासदार आहेत. आम्ही शिवसेनेचे आहोत. राज्यात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे. एका सरकारमधील खासदाराने आपल्याच्या मंत्र्यांबाबत अशी टीका करणं, योग्य नाही. मी उद्या मुंबईला जातो आहे, संजय पाटील यांच्या वक्तव्याबाबतची माझी नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी बोलून दाखवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.