Dahivadi nagar panchayat
Dahivadi nagar panchayat  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दहिवडीच्या अपक्ष नगरसेवकाचे पुण्यातून अपहरण; पण देशमुखांनी अर्ध्या तासात डाव उलटवला!

रूपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्यात पुन्हा एकदा अपहरण नाट्य रंगले. दहिवडी नगरपंचायतीसाठी (nagar panchyat election) अपक्षांसह नऊ सदस्यांची बेरीज राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) केली आहे. त्यामुळे प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) म्हणतील तोच नगराध्यक्ष होणार आहे. पण, सहलीवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे पुणे जिल्ह्यातून विरोधकांनी अपहरण केले. पण, प्रभाकर देशमुख यांनी आपली प्रशासकीय सेवेतील व राजकारणातील ताकद वापरून वरिष्ठ पातळीवररून यंत्रणा हलवली आणि अवघ्या अर्धा तासात नगरसेवकांसह अपहरणकर्त्यांना पोलिसांनी जरेबंद केले. (Independent corporator of Dahivadi abducted from Pune)

याबाबतची माहिती अशी आहे की, दहिवडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत सध्या अपक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसकडे नऊ सदस्यांची बेरीज आहे. त्यामुळे नगराध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणतील तोच होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, अशा परिस्थितीतसुध्दा हे पद मिळविण्यासाठी विरोधकांकडून हालचाली सुरु आहेत. यातूनच आजची नाट्यमय घटना घडली आहे.

प्रभाग क्रमांक १२ मधून अपक्ष निवडून आलेले राजेंद्र साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांसह सहलीवर आहेत. मात्र, त्यांच्या हालचालींवर काहीजण लक्ष ठेवून होते. संधी मिळताच सावज उचलण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली होती अन्‌ तशी संधी त्यांना आज (ता. २८ जानेवारी) मिळाली. पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणी एका बेसावध क्षणी राजेंद्र साळुंखे यांना उचलण्यात आले. ही बातमी समजताच राष्ट्रवादीमध्ये एकच कल्लोळ उडाला.

ही बातमी कानावर येताच प्रभाकर देशमुख यांनी अतिशय जलद हालचाली केल्या. आपल्यातील कौशल्य वापरुन व आपले प्रशासकीय सेवेतील तसेच राजकारणातील वजन वापरुन वरिष्ठ पातळीवरून सर्व पोलिस यंत्रणा हलवली. वजनदार नेतेमंडळी तसेच अधिकाऱ्यांची फोनाफोनी झाल्यावर पोलिस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली. उण्यापुऱ्या अर्धा तासात राजेंद्र साळुंखे आणि अपहरणकर्त्यांना पोलिसांनी जेरबंद केले.

तोपर्यंत दहिवडी पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी साळुंखे यांच्या कुटुंबीयांसह धाव घेतली होती. मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांसह जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला होता. परंतू प्रभाकर देशमुख यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. तसेच, दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी अत्यंत कौशल्याने सर्व परिस्थिती हाताळून जमाव शांत केला. या घटनेची चर्चा माणसह जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात होती. यासोबत प्रभाकर देशमुख हे शेरास सव्वाशेर ठरल्याची चर्चाही जोरात सुरु होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT