मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) बारा आमदारांचे एका वर्षासाठी करण्यात आलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज रद्द केले. हे निलंबन असंविधानिक असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्याला महाआघाडीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. (Urmila Matondkar responds to Devendra Fadnavis's criticism)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘सत्यमेव जयते’, असे ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की ‘राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो. हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले’
फडणवीस यांच्या ट्विटला शिवसेनेच्या नेत्या, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अभिनंदन! आनंद आहे, ‘लोकशाही’ वाचली याचा. पण, अध्यक्षमहोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शोभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त ५० लाख नाही, तर महाराष्ट्राच्या तमाम १२ करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे.
दरम्यान, मातोंडकर यांनी फडणवीसांना उद्देशून ट्विट करताच भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी मातोंडकर यांच्यावर ट्विटद्वारेच निशाणा साधला आहे. त्यात थोडी माहिती घ्या. आपलं वाचन चांगल आहे, असं ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका. आमदारांना सर्व कायदे, नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदारकीचा विषय तर त्यासाठी लोक न्यायालयात गेली होते. पण, न्यायालयाने काही सांगितलं नाही.
त्यावरही मातोंडकर म्हणाल्या की, अर्थातच विषय पूर्णतः वेगळे आहेत म्हणूनच ‘आनंद/अभिनंदन’. पण, प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांचा आहे. लोकशाहीचा तर आहेच आहे, त्यामुळे ‘वडाची साल’ऐवजी ‘आपला तो बाब्या’ जास्त बरोबर आहे. माझ्या आमदारकीची चिंता नसावी. त्याने माझे काम थांबलेले नाही.
‘आपली जळजळ, तळमळ ही केवळ ‘आमदारकी’साठीच आहे, हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील ‘प्रतिक्रियावादी’ भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा,’ अशा शब्दांत उपाध्ये यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव असलेल्या उर्मिला यांनी टोला लगावला आहे. त्यावर मातोंडकर म्हणाल्या की, गेली २ वर्ष जळजळ, तळमळ आणि जळफळाट हे शब्द कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत, हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला माहित आहे. मुद्दा सोडून बोलण्यात तथ्य नसतं. मुद्दा लोकशाहीचा, लोकहिताचा आहे. बाकी माझ्या जळजळीकरता antacid आहे. आपण आपला विचार करा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.