Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil: जयंत पाटील पुन्हा टार्गेटवर! परीक्षा सांगली-ईश्वरपुरातून होणार पण निकाल मुंबईतूनचं लागणार

Maharashtra Politics: सांगली जिल्ह्यात भाजपच्या संघटन मोहिमेला आमदार जयंत पाटील यांनी ब्रेक लावल्यानंतर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जयंत पाटील यांना घेरण्याची खेळी महायुतीकडून खेळली जात आहे.

Rahul Gadkar

Jayant Patil: नगरपालिका निवडणुकीत उरण-ईश्वरपूर आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचा करिष्मा कायम राहिला. सांगली जिल्ह्यात भाजपच्या संघटन मोहिमेला आमदार जयंत पाटील यांनी ब्रेक लावल्यानंतर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जयंत पाटील यांना घेरण्याची खेळी महायुतीकडून खेळली जात आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून गल्ली आणि जिल्ह्यातूनच नामोहरम करण्याची यशस्वी खेळी खेळली जात आहे. पहिल्या टप्प्यात ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आणि त्यांचे बंधू पदावरून अपात्र झाले. तर दुसऱ्या खेळीत सांगली जिल्हा बँकेत नोकर भरतीचा स्थगिती निर्णय देण्यात आला, त्याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला. मात्र, वारंवार होणाऱ्या या डावपेचामुळं आमदार पाटील हे चक्रव्यूहात सापडले आहेत. त्यामुळे गल्लीतून होणाऱ्या परीक्षेचा निकाल आता मुंबईतूनच लागणार असे आमदार जयंत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीने उपस्थित होऊ लागला आहे.

नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये राज्यात महायुती वर्चस्व गाजत असताना सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिकेमध्ये जयंत पाटलांनी आपला गड मजबूत राखला. महायुती सरकारच्या काळात ही महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांचा धबधबा हा माहितीच्या नेत्यांना पचणी पडलेला नाही. त्यामुळे ही सल भरून काढण्यासाठी आणि जयंत पाटील यांचा दबदबा कमी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी पहिला वॉर हा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर केला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील 444 लिपिकांच्या भरतीवर आक्षेप घेत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या नोकर भरतीला राज्य सरकारकडून स्थगिती आणली. मात्र, जयंत पाटील गटाला न्यायालयाने दिलासा देत ही नोकर भरतीची स्थगिती उठवली. जयंत पाटील यांच्या गटाकडून माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी खिंड लढवली. तर दुसरा वॉर हा उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणावर झाला. अतिक्रमण केल्याप्रकरणी नगराध्यक्ष आनंदराव मालगुडे यांचे पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. तर त्यांचे बंधू सुनील मालगुडे हे देखील अपात्र ठरले.

आमदार जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. थेट होम पिचवरच महायुतीच्या नेत्यांनी धक्का दिल्यानंतर दुसऱ्या हल्ल्यात गारद झालेल्या जयंत पाटलांनी थेट मुंबई घाटत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नगराध्यक्ष मालगुडे यांच्यासाठीच ही भेट असल्याचा निर्वाळा जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सांगली जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिले आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांच्या संशयाला वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे सहाजिकच महायुतीच्या नेत्यांवर पहिल्या टप्प्यात निर्बंध आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात आमदार पाटील यांच्याकडून कोणते स्पष्टीकरण आले नसले तरी सातत्याने होणाऱ्या चर्चेमुळे, त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेल्या भेटीमुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे. ईश्वरपूरचे दोन पदाधिकारी अपात्र झाल्यानंतर महायुतीच्या गोटामध्ये आनंद आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याची तयारी दर्शवली आहे.

राज्य पातळीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या राजकारणाचे साधून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जर प्रत्यक्षात राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीए सोबत गेला तर त्याचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचा आनंद काही क्षणापुरतं ठरण्याची शक्यता आहे. शिवाय या चर्चा निष्फळ ठरल्या तर न्यायालयीन लढाई तितकेच रंगतदार होणार आहे. मात्र, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी मागचे खरे कारण माध्यमांना सांगितले असले, तरी अपात्रतेचा निकाल मुंबईतच होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT