Jayant Patil, Pratik Pati, Vishal Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli NCP News : जयंत पाटलांची सांगली, हातकणंगलेत चाचपणी; प्रतीकसाठी फिल्डिंग...

Pratik Patil प्रतीक पाटील नेमके भाजप, की इंडिया आघाडीकडून लढणार असा प्रश्नही चर्चेला आला आहे.

Anil Kadam

Sangli NCP News : पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांचे विश्वासू नेते व आमदार जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. मात्र, जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाचे खंडन करीत सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चिरंजीव प्रतीक पाटील यांच्यासाठी पुन्हा जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

इंडिया आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसकडे असल्याचे निश्चित झाले असतानाही जयंत पाटलांनी सांगलीसाठी केलेला दावा हा चर्चेचा ठरत आहे. हातकणंगलेत मतदारसंघातून दोन महिन्यांपूर्वी त्याची मोहीम थंडावली होती. त्यामुळे प्रतीक हे इंडिया आघाडी, की भाजपमधून लढणार, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शरद पवारांचे विश्वासू जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या. भाजप प्रवेश करणार नसल्याचे सांगत त्या वृत्ताचे खंडन करावे लागले. सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. चिरंजीव प्रतीक यांच्यासाठी सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चाचणी सुरू करत असल्याचे सांगावे लागले.

त्याचवेळी जयंत पाटलांशी भाजप प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मात्र, जयंतरावांच्या वारंवार होणाऱ्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. जयंतरावांचे पुत्र प्रतीक यांच्यासाठी गेल्या काही महिने हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची तयारी सुरू होती. मात्र, जयंतरावांनी अचानक सांगलीतही चाचणी सुरू असल्याचे स्पष्ट करीत अनेक शंका उपस्थित करायला भाग पाडले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील आणि त्यांच्या टीमकडून मतदारसंघात दौरे करून नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा हातकणंगलेत जोर धरू लागताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची कोंडी होण्याची चर्चाही रंगली होती. या दरम्यानच साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने स्वाभिमानीने आंदोलनाचे अस्त्र उगारले. ऊसदरासाठी धडक देत स्थापन झाल्यापासून प्रथमच राजारामबापू कारखाना एक दिवसासाठी बंद पाडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने प्रतीक पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, काही कारखान्यांच्या ऊसदराची काेंडी आम्हीच फोडल्याचा राजू शेट्टी यांचा दावा आहे. ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी चालवली होती. ऊस उत्पादकांची मोठ बांधून हातकणंगलेतून रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच प्रतीक पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला होता.

त्याचवेळी हातकणंगलेतील सहा विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून गोपनियरित्या चाचपणी करण्यात आली होती. यामध्ये प्रतीक पाटील नंबर एकला असल्याचे दिसून आले. दोन महिन्यांपासून प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा विरळ झाली होती, पण जयंतरावांची भाजप प्रवेशाची चर्चा रंगल्यानंतर आपण लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असल्याचे स्पष्ट करावे लागले.

हातकणंगले तर सोडाच, पण इंडिया आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने त्यांच्याकडून मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे, अशातच सांगलीच्या जागेवर जयंतरावांनी दावा केला. दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघात जयंत पाटील यांच्या टीमने पुन्हा जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे काही निकटवर्तीय दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT