सोलापूर : सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघावरून (Lok Sabha) गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यांमध्ये जोरदार वाक्युद्ध सुरू आहे. मतदारसंघाबाबत सुरू असलेली चर्चा ही फक्त स्थानिक पातळीवरच आहे. राज्यपातळीवर यासंदर्भात कोणतीही चर्चा किंवा घडामोड नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. (Jayant Patil's important statement regarding Solapur Lok Sabha Constituency)
जयंत पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रवादीची आढावा बैठक त्यांनी घेतली. त्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. बैठकीसाठी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, शहर राष्ट्रवादीचे निरीक्षक शेखर माने, उत्तम जानकर, भगीरथ भालके आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ग्रामीण राष्ट्रवादीचा तालुकानिहाय आढावा घेतला. सुरवातीला कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ३५ जागा महाविकास आघाडी जिंकेल, तसेच विधानसभेच्या १९२ जागांवरही बिगर भाजपचे आमदार होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या महाविकास आघाडीला राज्यात पोषक वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी आपापसांत भांडू नये, असा सल्लाही पाटील यांनी दिला.
विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार आमदार होईपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांचा असतो. आमदार विजयी झाल्यानंतर मात्र पक्ष आमदाराचा होतो, ही पद्धत बदलणे आवश्यक आहे. पक्षात सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
पदासाठी सभासद नोंदणीचा निकष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सभासद नोंदणी हाती घेण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षांमधील पदे देताना कोणत्या कार्यकर्त्यांनी कोणत्या भागात किती सभासद नोंदणी केली आहे, याचा निकष आगामी काळात लावण्याचे संकेतही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ग्रामीण राष्ट्रवादीच्या बैठकीत दिले. सत्ता असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामे प्राधान्याने करावीत, अशी मागणी यावेळी पुढे आली.
बारामती आणि कर्जत जामखेडची मागणी केल्याने नाराजी
ग्रामीण राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहर राष्ट्रवादीचीही बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीला कोण कोण हजर आहेत, याची हजेरी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी घेतली. सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचे या वेळी शहरातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा व कर्जत जामखेड विधानसभा या मतदारसंघांची मागणी केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.