Jayawantrao Jagtap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Adinath Sugar Factory : जयवंतराव जगतापांनी मांडला आदिनाथ कारखान्याच्या बिनविरोध निवडीचा फॉर्म्युला; म्हणाले, 'पवारसाहेब, अजितदादा, विजयदादांना...'

Jayawantrao Jagtap's Formula : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गेल्या वर्षभरापासून कारखाना बंद अवस्थेत असून सध्याची स्थिती पाहता कारखाना सुरू होण्यासारखी परिस्थिती नाही

Vijaykumar Dudhale

Karmala, 13 March : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गेल्या वर्षभरापासून कारखाना बंद अवस्थेत असून सध्याची स्थिती पाहता कारखाना सुरू होण्यासारखी परिस्थिती नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आदिनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, अशी भूमिका माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मांडली. ती मांडताना त्यांनी बिनविरोधचा फॉर्म्युलाही सांगितला आहे. आता जगताप यांचा फॉर्म्युला मान्य होऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध होते का हे पाहावे लागेल.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ( Adinath Sugar Factory Election) जाहीर झाली असून १७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्वच गट तयारीला लागले आहेत. आमदार नारायण पाटील यांनी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे, तर माजी आमदार संजय शिंदे यांनी तर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीरच करून टाकले आहे. बागल गटानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले आहे, त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जयवंतराव जगताप (Jayawantrao Jagtap) म्हणाले, आदिनाथ कारखान्याची सत्ता आतापर्यंत अनेकांनी उपभोगली आहे, त्यांनी आपापल्या पद्धतीने कारखान्याचा फायदाच घेतला आहे. आता कारखाना आर्थिक गर्तेत सापडलेला आहे, त्यामुळे निवडणूक झाली तरी तो सुरू होईल, अशी परिस्थिती नाही, त्यामुळे आर्थिक बोजा आणखी वाढू नये, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कारखाना बिनविरोध करावा.

कारखाना बिनविरोध करावा, अशी भूमिका मांडताना जयवंतराव जगताप यांनी त्याबाबतचा फॉर्म्युलाही सांगितला आहे. तालुक्यातील सर्व गट हे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्याकडे जावे आणि संचालक मंडळ निवडीचे सर्वाधिकार या तिघांना देण्यात यावेत. त्यातून कारखाना बिनविरोध करावा, तरख कारखाना सुरळीत चालेल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कार्यक्षम मुख्यमंत्री आहे. कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तालुक्यातील सर्वजण मिळून जाऊ. आदिनाथ काखान्यालाला मदत करावी, अशी विनंती करू, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. आतापर्यंतच्या लोकांनी कारखान्याची काय अवस्था करून ठेवली आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे नव्या लोकांना संधी द्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

यापूर्वी निवडून दिलेले संचालक हे आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालविण्यास अपयशी ठरले आहेत, मकाई काराखान्याची देखील निवडणूक झाली, पण कारखाना सुरू झाला नाही. आदिनाथच्या स्थापनेपासून ज्यांनी सर्वाधिक काळ कारखान्यावर सत्ता भोगली त्यांनी कारखान्याची नुकसानाची जबाबदारी घ्यावी. आदिनाथ बंद असताना आणि कारखान्यावर प्रशासकीय कारभार असतानाही कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला, हे मी पाहिले आहे, असेही जयवंतराव जगताप यांनी स्पष्ट केले.

आदिनाथ कारखाना उभारण्यासाठी गोविंदबापू पाटील यांनी २४ वर्षे चप्पल घातली नाही. त्यावरून माजी आमदार संजय शिंदे गटाच्या मेळाव्यात किती वर्षे हे सांगणार असा सवाल विचारण्यात आला. पण गोविंदबापूंनी त्याग केला. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी योगदान दिले. ते सध्या हयात नाहीत, त्यांच्या पाठीमागे असे बोलणे योग्य नाही. जे बोलले त्यांची समाजात आणि गावातील लायकी, वागणूक माहिती आहे, तुमच्या घराबद्दल आणि तुमच्याबद्दल बोललं तर तुम्हाला किती वाईट वाटेल, असा प्रश्न जयवंतराव जगताप यांनी विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT