
Satara, 13 March : कराड दक्षिणमधील काँग्रेसचे प्रमुख नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातारा दौऱ्यात उंडाळकर यांचा पक्षप्रवेश कधी होणार, हेही ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत उंडाळकर यांनी मोठा खुलासा केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या प्रवेशाबाबतची कल्पना देऊनच मी हा निर्णय घेतला आहे, असे उंडाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
कराड दक्षिणचे माजी आमदार (स्व.) विलासराव पाटील उंडाळकर यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा जोपासली. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह उंडाळकर (Udaysinh Patil Undalkar) यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबतची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. उंडाळकर यांच्या या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक प्रकारचा धक्का मानला जात आहे, कारण त्यांच्याच मतदारसंघातील एक मजबूत गट असलेल्या उंडाळकर यांनी पार्टी सोडणे हे पृथ्वीराजबाबांना एक प्रकारचा सेटबॅक बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाबाबतची माहिती आपण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan ) यांना भेटून दिली आहे. आमच्या ज्या अडचणी आहेत, त्या मी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानावर घातल्या आहेत. त्या अडचणींवर आमच्यामध्ये चर्चाही झाली आहे. पक्ष बदलाबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही कल्पना दिली आहे, त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व माझ्यावर नाराज आहे, असे मला वाटत नाही. काळाची गरज ओळखून प्रवाहासोबत जायला हवे, असेही उंडाळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल सातारा दौऱ्यावर आले होते, त्यावेळी उंडाळकर यांच्या रयत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली या बैठकीत उदयसिंह पाटील उंडाळकर यांना ताकद देऊन त्यांचे पालकत्व घ्यावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रयत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले.
अजितदादा म्हणाले, विलासकाका उंडाळकरांची काम करण्याची पद्धत आणि शिस्त मी जवळून पाहिली आहे, ज्या शिस्तीने त्यांनी तुम्हाला घडवले, ती शिस्त उदयसिंहांच्या सहकारी संस्थांमधून दिसत आहे, त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम तुम्ही करता त्याचे मोठे समाधान वाटते, यापुढे उदयसिंह पाटील यांना राजकीय ताकद आणि मदत देण्यात येईल, त्यामुळे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, असा शब्दही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उंडाळकर गटाला दिला.
उपमुख्यमंत्री अजितदादा हे शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन वाटचाल करीत आहेत, त्यामुळेच आपण काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे उंडाळकर यांनी स्पष्ट केले.
मकरंद पाटील हेच मुख्य सूत्रधार
उदयसिंह उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागे साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्याचा उल्लेखही उंडाळकर यांनी अजितदादा सोबत झालेल्या बैठकीत केला. या सर्व चर्चेचे मूळ हे मकरंद पाटील आहेत, असे स्पष्ट उद्गार त्यांनी बैठकीत काढले, त्यामुळे मकरंद पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता साताऱ्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी भक्कम करण्याच्या उद्देशाने पावले टाकण्यात सुरुवात केली असल्याचे यातून स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.