Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore News : 'कुणाचीतरी सुपारी घेऊन माणच्या स्वयंघोषित नेत्याचे आरोप; त्याने लायकीत...'; गोरे Vs देसाई वाद पेटला

Umesh Bambare-Patil

Satara BJP News : भारतीय जनता पक्ष हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष असून सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि नेते मिळून-मिसळून काम करत आहेत. माण तालुक्यातील स्वयंघोषित नेत्याने आपल्या लायकीत राहावे आणि भाजपची मापे काढू नयेत. त्यांनी माहिती घेवून बोलावे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, याबाबत लवकरच सर्वांना समजेल, असे प्रतिउत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी अनिल देसाई यांना दिले आहे.

भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे. कदम म्हणाले, माण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमधील स्वयंघोषित नेता अनिल देसाई आम्हाला शहाणपणा शिकवत आहे. त्यांनी भाजप कार्यालय, खासदार उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याबद्दल काही चुकीची वक्तव्ये केली आहेत.

अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरेंमुळे (Jaykumar Gore) भाजप बदनाम झाली, गोरेंनी खासदार उदयनराजे भोसले यांना तिकिट मिळू नये म्हणून प्रयत्न केले. निवडून आल्यानंतर उदयनराजेंनी ज्यावेळी भाजप कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी तेथील जयकुमार गोरे यांचा फोटो काढून फेकून दिला. या तिन्ही आरोपांत काहीही तथ्य नाही. ज्यांनी आरोप केला त्यांनी कोणत्या पक्षाची सुपारी घेतली हे आधी जाहीर करावे. आमदार जयकुमार गोरे तीनवेळा आमदार झालेत.

2019 च्या निवडणुकीत ज्यांनी त्यांच्यावर टीका केली, त्या सगळ्यांनी आमचं ठरलय म्हणून खच्चून विरोध केला. तरीही आमदार जयकुमार गोरे निवडून आले. त्यामुळे प्रसिद्धीसाठी काहीही शब्द तोंडातून काढणाऱ्या स्वयंघोषित नेत्याने , स्वतःला पडलेली मते आणि त्यांचा आवाका याचा अभ्यास करून मगच भाजप पक्ष आणि आमच्या नेत्याना नावे ठेवावीत. अन्यथा जिल्हा परिषद सोडाच त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही.

खासदार उदयनराजे यांना सातारा लोकसभेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळावी आणि ते निवडून यावेत यासाठी भारतीय जनता पक्ष्याच्या लहानात लहान कार्यकर्त्यापासून ते सर्व नेत्यांपर्यंत सर्वांनी एकत्र काम केले आणि भाजपचा खासदार सातारा लोकसभेत पहिल्यांदा निवडून आणला आहे.

आमदार जयकुमार गोरे यांचा लोकसभा मतदारसंघ जरी माढा असला तरीही त्यांनी आपली पूर्ण ताकद उदयनराजे यांना उमेदवारी मिळावी आणि ते निवडून यावेत यासाठी लावली होती.सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना तिकिट मिळणार हे सगळ्यांना माहीत होते. परंतु आता विधानसभा निवडणुका आल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये भांडणे लगावित म्हणून हे विरोधक असे आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता कुठेही अशा प्रकाराला थारा देणार नाही.

आज देसाई यांनी भाजपवर आरोप केले असले तरी त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या अनेक वेळा मागे लागून पक्षाची पदे घेतली आहेत. परंतु संघटनेसाठी काही काम केले नाही. त्यांच्या घरातील सदस्य भाजपच्या चिन्हावरच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे स्वतःचीच लाज वाटून त्यांनी विरोधी आघाडीत काम करायला सुरुवात केली आहे.

लोकसभेतील विजयानंतर त्या दिवशी उदयनराजे भोसले पक्ष कार्यालयात आले नव्हते. त्या दिवशी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा कार्यालयात जल्लोष करून लाडू वाटप करण्यात आले, दुसऱ्या दिवशी उदयनराजे भोसले यांचा सत्कार करायला आमदार गोरे जलमंदिरामध्ये गेले होते. उलट उदयनराजे यांच्या आडून देसाईंची भाजपावर वार करायची ही पद्धत अतीशय चुकीची आहे.

जिल्ह्यातील सर्व नेते भाजपाचे चिन्ह हेच आपला नेता मानून काम करतात. त्यामुळे कोणीही काही वल्गना केल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यावर फरक पडणार नाही. त्यांनी आधी ठरवावं की ते कोणत्या पक्षात आहेत. पातळी सोडून राजकारण करू नये व बोलू नये.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT