Jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : राजकारणातून मला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा नियतीने करेक्ट हिशेब केला; जयकुमार गोरेंचा रामराजेंवर हल्लाबोल

Jaykumar Gore Attacked On Ramraje : सातारा जिल्हा गेली 50 वर्षे ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, त्यांनी सातारा जिल्ह्याला काय दिले, याचाही विचार करण्याचा वेळ आता आली आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामा ब्यूरो

पांडूरंग बर्गे

Satara, 16 February : फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि माण खटावचे जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संबंध संपूर्ण सातारा जिल्ह्याला सर्वश्रूत आहेत. दोघांमधून विस्तवही जात नाही. त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी, टीका टिपण्णी करण्याची एकही संधी दोघांकडूनही सोडली जात नाही. फलटणमधून रामराजे गटाचा उमेदवार विधानसभेला पडला असून त्याचा संदर्भ घेऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर हल्लाबोल केला आहे.

मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला, आज तेच स्वतः संपलेले आहेत. गेली २० वर्षे ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना नियतीने चोख उत्तर दिलेले आहे, असा टोला जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना नाव न घेता लगावला आहे.

कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी पुन्हा एकदा रामराजेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मला राजकारणातून संपवण्याचे प्रयत्न सातत्याने करण्यात आले. पण मला संपविण्याच्या प्रयत्नात आज ते स्वतःच संपले आहेत. त्यांनी सुरुवात केली, पण शेवट आज नियतीने केला आहे. त्यांचा हिशेब नियतीने केला आहे.

सातारा जिल्ह्यात आपण सर्वांनी एकत्र काम करून महायुतीचे सर्वच्या सर्व आठही आमदार निवडून आणले आहेत. त्यामुळे महायुतीनेही जिल्ह्याला तब्बल चार कॅबिनेट मंत्रिपदे दिलेली आहेत. हा इतिहास आहे. मात्र, सातारा जिल्हा गेली ५० वर्षे ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, त्यांनी सातारा जिल्ह्याला काय दिले, याचाही विचार करण्याचा वेळ आता आली आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

मंत्री गोरे म्हणाले, आपल्याला सूडाचे राजकारण करायचे नाही. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी, जिल्ह्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला राजकारण करायचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री आणि आमदारांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

मी मंत्री असलो तरी भीमराव पाटील माझे गुरु

मी आज आमदार, मंत्री झालो असलो तरी सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती भीमराव पाटील यांना मी माझे गुरु मानत आलो आहे. निष्ठा, विकासकामांचा पाठपुरावा करून ते काम पूर्णत्वास नेणे, सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखात समरस होणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणे, आपल्या मातीशी इमान राखणे आदी भीमरावकाकांचे गुण अनुकरणीय असे आहेत, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पाटील यांचे कौतुक केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT