Sanjay Raut-Uddhav Thackeray-Jyoti Waghmare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jyoti Waghmare : ‘मैदानात उतरून लढण्याची ताकद तुमच्या मालकाची नाही अन्‌ ते मान्य करण्याची हिम्मत बोलक्या पोपटात नाही’

Shivsena VS Shivsena UBT : बच्चू कडू यांच्या शिवसेना प्रवेशावरून ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 02 May : शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अग्रलेखातून टीका करणारे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार ज्योती वाघमारे यांनी शेलक्या शब्दांत सुनावले आहे. ‘मैदानात उतरून लढण्याची ताकद तुमच्या मालकाची नाही अन्‌ ते मान्य करण्याची हिम्मत बोलक्या पोपटात नाही, अशी जहरी टीका वाघमारे यांनी केली आहे.

खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) म्हणाल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढणारी ताकद पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तोंड कडू झालं आहे. ज्यांना वास्तव पचवण्याची हिम्मत नसते, त्यांचा इतरांच्या भरभराटीमुळे जळून कोळसा होतो आणि कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच राहतो. तशीच उबाठाची वृत्तीसुद्धा काळवंडली आहे.

बच्चू कडू जोपर्यंत तुमच्या मंत्रिमंडळात होते, तोपर्यंत ते तुम्हाला गुणी वाटत होते. पण ते शिवसेनेसोबत येताच तुम्हाला त्यांच्या अवगुणांचा साक्षात्कार झाला का. हा तुमचा ढोंगीपणा संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतो आहे, असा टोलाही खासदार वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.

त्या म्हणाल्या, संजय राऊतांसारख्या तोंड पाटीलकी करणाऱ्यांना स्वतःच्या पक्षात काय चाललं आहे, हेही माहिती नसतं. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठविणार म्हणून टिमकी वाजवणारे संजय राऊत हे तोंडावर आपटले आहेत आणि पक्षाने अंबादास दानवेंना विधान परिषदेवर पाठवलं. स्वतःच्या पक्षात कुणाला संधी मिळते, हे माहिती नसतं. त्याच्या शब्दाला कवडीचीही किंमत नाही, हे आता महाराष्ट्राला कळून चुकलं आहे.

मैदानात उतरून लढण्याची हिम्मत तुमच्या मालकाची नाही आणि हे मान्य करण्याची हिम्मत ह्या बोलक्या पोपटात नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतून पळ का काढला, याचं उत्तर आधी राऊतांनी द्यावं. काँग्रेसच्या खोडावर तुमच्या द्वेषाची वेल चढलेली आहे, काँग्रेसच्या वृक्षावर जगणाऱ्या बांडगुळांची अवस्था तुम्हाला आलेली आहे, अशा शब्दांत संजय राऊतांना वाघमारेंनी सुनावले

त्या म्हणाल्या, उबाठाला आता द्वेषाची हिरवी पालवी फुटलेली आहे. म्हणून शिवसेनेच्या झाडाला लागलेली भगवी फुलं तुमच्या डोळ्यात खुपत आहेत. हे लोक बौद्धीकदृष्ट्या दिव्यांग झालेली आहेत. शारीरिक दिव्यांगावर उपचार करता येतात, पण ज्यांच्या बुद्धीलाच लकवा मारला आहे, त्यांचं काय आहे.

काँग्रेसचे तळवे चाटून झाल्यानंतर हे लोक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्हाला सोबत घ्या म्हणून लाचारी करत आहेत, त्याचं उत्तर कोण देणार, असा सवाल ज्योती वाघमारे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT