

Satara, 02 May : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळविण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जो प्रकार केला आहे, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नव्हता. त्या प्रकारानंतर आमदार शिंदे यांना समजही देण्यात आली होती. तरीही त्यांचं स्टेटमेंट देणं काही बदलेलं नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यावर लवकर निर्णय घेतील. तसेच शेवटी काही कटू निर्णय घ्यायचा असेल तर तोही उपमुख्यमंत्री घेतील, असा दावा शिवसेना नेते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला.
सातारा जिल्हा परिषदेत (Satara Zilla Parishad) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असतानाही भाजपने फोडाफोडी करून अध्यक्षपदी आपला सदस्य बसवला आहे. पण त्यासाठी भाजपने चतूर खेळी करत शिवसेना आमदार महेश शिंदेंच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपला म्हणजे महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे यांना मतदान केले. ही भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई आणि एकनाथ शिंदे यांना पटलेली नाही, त्याबाबतच शिरसाट यांनी महेश शिंदेंवर कारवाईच्या अनुषंगाने भाष्य केले आहे.
महेश शिंदे (Mahesh Shinde) यांचे विरोधक असलेले कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. त्याबाबत शिरसाट म्हणाले, महेश शिंदेंचे विरोधक आहेत, म्हणून त्यांना शिवसेनेत घ्यायचं नाही, ही भूमिका योग्य नाही. विरोधक का आहेत, हेही तपासून घेतलं पाहिजे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्यांचा पक्षप्रवेश घेतला आहे, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारूनच घेतला असावा. शिंदेंना विचारल्याशिवाय कोणाचाही पक्षात प्रवेश होत नाही आणि कोणालाही पदं दिली जात नाहीत, असेही शिरसाट यांनी नमूद केले.
ते म्हणाले, सातारच्या शिवसेनेच्या राजकारणात काय बदल होतील, याची लवकरच माहिती आपल्याला मिळेल. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे काही काळात त्यांचा निर्णयही जाहीर करतील.
महेश शिंदे यांच्याबाबतचं घरातील भांडणं नेमकं कोणत्या थराला गेलं आहे, याची मला कल्पना नाही. पण हे भांडण मिटलं पाहिजे, आपापसांत भांडू नये, या भूमिकेत एकनाथ शिंदे आहेत. पुढच्या आठवड्यात महेश शिंदे यांना बोलावून घेऊन विचारलं जाईल. तसेच काही कटू निर्णय घ्यायचा असेल तर तोही एकनाथ शिंदे घेतील, असा दावा शिरसाट घेतील.
त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो
माणसांवर पक्ष नसतो. पक्षाच्या सपोर्टवर माणसाचं नेतृत्व ठरतं. निश्चितच काही नेत्यांची वैयक्तिक ताकद असते, हे नाकारता येत नाही. पण आम्हीच पक्षापेक्षा मोठं असं समजण्याचं काही जण चूक करतात, त्याचा परिणाम त्यांना निश्चित भोगावा लागतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.