mahayuti and mva  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur political updates : कागल, जयसिंगपूर, चंदगडात अटीतटीची लढत; प्रस्थापित आमदारांच्या विरोधात बांधली मोट

local Body election News : पारंपारिक लढत होणार असून अटीतटीची निवडणूक म्हणून याकडे पाहिले जात आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या नगरपालिकेकडे असणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणुकीचे मतदान येत्या दोन डिसेंबरला पार पडणार आहे. शुक्रवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर प्रत्येक नगरपालिकेतील लढत स्पष्ट झाली आहे. सर्वच नगरपालिकेतील चित्र पाहिले तर प्रस्थापित आमदारांच्या विरोधात आघाडीने मोट बांधल्याचे चित्र दिसत आहे. कागल, जयसिंगपूर आणि चंदगड नगरपालिकांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

जयसिंगपूरमध्ये हायव्होल्टेज लढत

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असणाऱ्या जयसिंगपूर नगरपालिकेत हायव्होल्टेज लढत होणार आहे. 26 जागांसाठी एकूण 52 उमेदवार रिंगणात असणार आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी दोनच उमेदवार रिंगणात असणार आहेत. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची राजश्री शाहू आघाडी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत असणार आहे. पारंपारिक लढत होणार असून अटीतटीची निवडणूक म्हणून याकडे पाहिले जात आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या नगरपालिकेकडे असणार आहे.

कागलमध्ये मुश्रीफ, घाटगेविरुद्ध मंडलिक संघर्ष

जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कागल नगरपालिकांमध्ये एक जागा बिनविरोध झाल्याने 22 जागांवर निवडणूक लागली आहे. त्याशिवाय नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी व शाहू आघाडीचा एक बिनविरोध झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी चार व नगरसेवक पदासाठी 65 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते मंत्री हसन मुश्रीफ, छत्रपती शाहू आघाडीचे समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे यांच्या आघाडीच्या विरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे ) माजी खासदार संजय मंडलिक यांचा गट व काँग्रेस गट एकत्र आला आहे.

बिनविरोधचा डाव अपक्षांनी उधळला

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पन्हाळा नगरपालिकेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. शिवाय नगराध्यक्ष पद देखील बिनविरोध करण्याच्या हालचाली सत्ताधारी गटाकडून सुरू होत्या. मात्र, सत्ताधारी जनसुराज्य शक्ती पक्षाला विरोधातील उमेदवारांची मनधरणी करण्यात अपयश आले आहे. मात्र, काही जागांवर जनसुराज्य शक्तीने इच्छुकांची मनधरणी करण्यास यश मिळवले आहे. 17 जागांपैकी सहा जागा ह्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे अकरा जागांसह नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

पन्हाळा नगरपालिकेचे बिनविरोध उमेदवार

पन्हाळा नगरपालिकेतील शिव शाहू आघाडीचे सतीश भोसले, प्रियांका गवळी हे बिनविरोध निवडून आले आहेत. जनसुराज्य शक्तीचे प्रतीक्षा वराळे, रामानंद गोसावी, सखाराम काशीद, असिफ मोकाशी हे बिनविरोध निवडून आले आहेत.

आजरा नगर पंचायतसाठी तिरंगी लढत

आजरा नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे (BJP) नेते अशोक चराटी यांच्या सत्ताधारी ताराराणी आघाडी या पक्षाच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी व आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती, जुना भाजपचा गट या दोन आघाड्या रिंगणात उतरणार आहेत. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार ही नगराध्यक्षासह काही प्रभागात नशीब आजमावणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहे. तर नगरसेवक पदासाठी उभारलेल्या ५८ उमेदवारांपैकी 20 उमेदवार यांनी माघार घेतली आहे.

हुपरी नगरपालिकेत तिरंगी लढत

नगराध्यक्षपदासाठी आठ पैकी दोघा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सहा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदासाठी दहा प्रभागात एकूण ९२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना शिंदे युतीतर्फे मंगलराव माळगे, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतर्फे सुनील धोंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तर्फे आण्णासाहेब मधाळे, शिवसेना ठाकरे तर्फे मीना जाधव तर अपक्ष श्रीमंत शिराळे, रमेश भोरे अशी बहुरंगी लढत होणार आहे.

गडहिंग्लजमध्ये जनता दल, भाजप, शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी लढत

नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत होणार असून सहा उमेदवार रिंगणात तर राष्ट्रवादीतून विनोद बिलावर यांनी बंडखोरी केली आहे. नगरसेवक पदाच्या २२ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणातअसून ८ अपक्ष नशीब आजमावणार आहेत. राष्ट्रवादीविरुद्ध भाजप, जनता दल, जनसुराज्य, शिंदे शिवसेना महायुती यांच्यात होणार प्रमुख लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या ७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यात माजी उपनगराध्यक्ष रामदास कुराडे यांचाही समावेश आहे. तर नगरसेवक पदाचे २६ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

हातकणंगलेत बहुरंगी लढत

हातकणंगले नगरपालिका निवडणुकीत बहुरंगी लढतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. नगराध्यक्षपदासाठी एकूण 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील दोन उमेदवाराने माघार घेतली तर 20 जागांसाठी एकूण 149 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील आत्तापर्यंत 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. हातकणंगले नगरपालिकेतील निवडणूक ही शिवसेनाविरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात लढत असणार आहे.

मलकापूर नगरपालिकेत दुरंगी लढत

मलकापूर नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती भाजप आणि राष्ट्रीय दलित महासंघविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे गट अशी लढत होणार आहे. १९ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार असून एकूण सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामधील तिघांनी माघार घेतल्याने तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी झुंज देणार आहेत. त्यातील भाजप आणि जनसुराज्य पक्षातील काही उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी केली आहे.

दोन राष्ट्रवादीविरोधात भाजप, शिवसेना लढणार

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रणित राजर्षी शाहू आघाडी विरोधात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आघाडी अशी दुरंगी लढत होणार. भाजपचे नेते आमदार शिवाजी पाटील आणि शिवसेनेत झालेल्या चर्चेनुसार शेवटच्या क्षणात भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र करत भाजप शिवसेनेला आव्हान दिले आहे. नगराध्यक्षपदासाठी जवळपास चार उमेदवार रिंगणात असून 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT