

Mumbai News: गेल्या 20 वर्षांपासूनचं राजकीय वैर मिटवत आधी मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढत असताना महाविकास आघाडीतील मनसेची एन्ट्री वेटिंगवर असून तिला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे हे मविआतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान,आता काँग्रेसनं (Congress) उद्धव ठाकरेंना मोठी गुगली टाकल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसनं आता थेट माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठी ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं अशी ऑफर देत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसनं यापू्र्वीच स्वबळाची घोषणा केली आहे. तर उद्धव ठाकरेंनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीशी जुळवून घेण्यात थोडा हात आखाडता घेतला आहे..
पण आता काँग्रेसनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. पण यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून ठाकरेंसमोर मोठी अट ठेवली आहे. मनसेची साथ सोडून जर उद्धव ठाकरे सोबत आले तर काँग्रेस स्वबळाचा पुनर्विचार करेल असं म्हटलं आहे. पण यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेची साथ सोडली तरी,काँग्रेसनं काही अटी अन् शर्ती असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. एवढंच नव्हे तर कुणाच्या मनीध्यानी नसतानाही ते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीही झाले. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर 2022 मध्ये ठाकरेंचं सरकार पडलं. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत मविआला महाराष्टात चांगलं यश आलं. पण विधानसभेला मात्र महायुतीनं जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला.यानंतर स्थानिकच्या निवडणुकीच्या घोषणेआधीच मविआत स्वबळाच्या चर्चा झडू लागल्या.
त्यात भर म्हणजे महाविकास आघाडीत असतानाही उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विरोध न जुमानता राज ठाकरे आणि मनसेसोबत हातमिळवणी करत वेगळी चूल मांडण्यासाठी जोरदार तयारीही सुरू केली. यामुळे काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरेंविषयी उघड दाखवलं नसलं तरी नाराजीचा अंडरकरंट दिसून येत होता. त्याचमुळेच काँग्रेसनं 'एकला चलो रे'चा नारा दिला.
मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याबाबतचा प्रस्ताव पवारांसमोर काँग्रेस नेत्यांनी ठेवल्याची माहिती आहे. यावेळी शरद पवार यांच्या पक्षासोबत काँग्रेसची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याविषयी काँग्रेस सकारात्मक आहे. ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीकतेमुळे महाविकास आघाडीच्या गोटात आजही गोंधळ उडाल्याची बोललं जात आहे.
मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांमध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची अपडेट आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेसाठी मुंबईत 70 जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे. पण मनसेकडून 125 प्रभागांची यादी मनसेकडून तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीतील मनसेच्या एन्ट्रीला काँग्रेसचा आजही ठाम विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनसेसोबत युतीची गाडी सुसाट असताना उद्धव ठाकरेंची शिवसेना आघाडीत राहणार बाहेर पडणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.पण याचदरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून आलेली आहे.
मविआचे शिल्पकार असलेल्या शरद पवार आघाडीमधील मनसेच्या एन्ट्रीबाबत सकारात्मक असल्याचं समोर येत आहे. अशातच शरद पवारांच्या भेटीनंतरही काँग्रेस अजूनही राज ठाकरेंसोबत न जाण्यावरच ठाम असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी आम्ही समविचारी पक्षांनाच सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.