Sharad Pawar, Rohit Pawar, Uday Samant. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar Political News : 'सामंतां'च्या स्वाक्षरीने 'पवारां'च्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट..!

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Political News : गेल्या साडेचार वर्षांत वेळोवेळी पाठपुरावा करुन कर्जत एमआयडीसी साठीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतलीय आणि आता संबंधित फाईलवर केवळ आपली एक अंतिम स्वाक्षरी बाकी आहे.

ती स्वाक्षरी आपण केली, तर आज आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या मतदारसंघासाठी मोठं गिफ्ट ठरेल, असा टोला आमदार रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला आहे.

नगर Nagar जिल्ह्यात मोठ्या चर्चेत असलेली कर्जत एमआयडीसी मंजुरी संदर्भात आज उद्योगमंत्री उदय सामंत Uday Samant यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे. वास्तविक कर्जत एमआयडीसी संदर्भात गेल्या साडेचार वर्षांपासून कर्जत - जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गटाचे आमदार रोहित पवार यांनी मागणी धरून ठेवलेली आहे.

त्यात भाजपचे आमदार राम शिंदे Ram Shinde यांनीही सहमती दर्शवलेली असली तरीही अद्याप या एमआयडीसीला राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. याबाबत आज नागपूर हिवाळी अधिवेशनात सामंत यांनी बैठक बोलावली असून या बैठकीत याबाबत काय निर्णय होतो याकडे अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, आयोजित बैठकीस भाजपचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांना निमंत्रित केले असले तरी याच मतदारसंघाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांचे निमंत्रितांमध्ये नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून आता खुद्द रोहित पवार यांनी या बैठकीबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.

कर्जत एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी गेल्या तीन अधिवेशनापासून मी कसोसीने पाठपुरावा करत आहे, परंतु उदय सामंत यांनी दिलेला शब्दही पाळत नसल्याचं दुर्दैवानं म्हणावं लागतंय.

किमान या अधिवेशनात तरी हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी आपणास पत्र दिले आहे. तसेच ‘युवा संघर्ष यात्रे’त घेतलेल्या मुद्द्यांमध्ये एमआयडीसीच्या मुद्द्याचाही समावेश आहे.

त्यानुसार आपल्या विभागाने याबाबत आज बैठक आयोजित केली, याबद्दल आपले मनापासून आभार. परंतु या बैठकीसाठी आपण मला आमंत्रित केलं नाही, है दुर्दैव आहे. राजकीय दबावापोटी आपण दुजाभाव करत असून, आपली ही अडचण मी समजू शकतो. परंतु आपली ही कृती म्हणजे ‘कुणाशीही आकस बाळगणार नाही किंवा ममत्वभाव ठेवणार नाही.

या आपण घेतलेल्या शपथेचा सरळसरळ भंग आहे, असा गंभीर आरोप आ. पवार यांनी केला आहे. राज्यात सर्वाधिक एमआयडीसी पवार साहेबांनी सुरु केल्या आहेत. शिवाय आपण आज वेगळ्या पक्षात असलात, तरी कधीकाळी पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळं आपल्या अंतकरणाच्या एका कप्प्यात साहेबांविषयी नक्कीच आदराचं स्थान असेल, यात शंका नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

म्हणून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आजच माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी माझ्यासह मतदारसंघातील सर्वच लोकांची अपेक्षा असल्याचे पवार यांनी समाज माध्यमातून व्यक्त केली आहे.

( Edited by Amol Sutar )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT