Kolhapur Collector News
Kolhapur Collector News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Collector News : नवीन जिल्हाधिकारी येण्यापूर्वीच नेत्यांचा विरोध; भ्रष्ट अधिकारी कोल्हापुरात नको!

Mangesh Mahale

राहुल गडकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याबद्दल जिल्ह्यात संताप व वाद असताना नव्या जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा रंगली आहे. सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, पण येणाऱ्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांमुळे आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या अधिकाऱ्यांवर कोरोना काळात 25 रुपयांचा मास्क 250 रुपये लावल्याचा आरोप आहे. अशा अधिकाऱ्याचे नाव कोल्हापूर जिल्हाधिकारी पदासाठी चर्चेत असल्याचे सांगितले जाते. मंत्र्यांनी नुकतेच एका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यात 'अमन' हवी आहे, असे एका बड्या नेत्याला वाटत आहे. पण त्याला भाजपकडून विरोध सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आतापासूनच अंतर्गत वाद सुरू असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीपासूनच त्यांची वादग्रस्त कारकीर्द लक्षवेधी ठरली आहे. कार्यकाळ संपल्यानंतरही ते कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. पत्रकारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही जिल्हाधिकारी चर्चेत राहिले.

अशातच त्यांची बदली पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचा पुढील जिल्हाधिकारी कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, पण कोल्हापूरचा पुढील जिल्हाधिकारी म्हणून दोघांची नावे चर्चेत आहेत. या दोघांपैकी एका अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप आहे.

कोरोना काळात या अधिकाऱ्याने भलतेच हात धुऊन कोल्हापूरला लुटले असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. २५ रुपयांचा मास्क २५० रुपयांना विकला असा आरोप आहे. जवळपास ६५ कोटींचा घोटाळा असल्याचे सांगितले जाते.

त्याविरोधात भाजपचे जिल्हा परिषद सदस्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या घोटाळ्याची सत्यता पडताळून पाहावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. असा अधिकारी कोल्हापुरात आणण्यासाठी कोल्हापुरातील एक बडा नेता प्रयत्न करत आहे.

अधिकारी आणण्यावरून अंतर्गत राजकारण

सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी कोणता अधिकारी यावा? यासाठी जिल्ह्यातील नेत्यांमध्ये अंतर्गत राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. आपल्या मनाविरुद्ध वागणारा अधिकारी नको?

अशी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदासाठी दोन आयएएस अधिकारी शर्यतीत आहेत. त्यापैकी घोटाळा असणाऱ्या अधिकाऱ्याला बऱ्याच नेत्यांनी विरोध केला आहे. सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली होण्याआधीच नव्या जिल्हाधिकाऱ्यावरून सत्ताधाऱ्यांत चांगलीच चर्चा रंगली आहे.

अडीच महिने आयुक्तपद नाही

कोल्हापूर महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्त व प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तपद गेले अडीच महिन्यांपासून रिक्त होते. या ठिकाणी कोणता अधिकारी आणायचा?

यावरून भाजप आणि शिंदे गटात चुरस होती. अंतर्गत वादामुळे अडीच महिन्यांपासून कोल्हापूरला आयुक्तपद रिक्त होते. अखेर राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त देण्यात आला. सध्या अशा पद्धतीचे राजकारण जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवरून सुरू असल्याचे सांगितले जाते.

आम्ही रस्त्यावरही उतरू...

कोल्हापुरात जिल्हाधिकारी म्हणून येत असताना हा जिल्हा राजर्षी शाहू महाराज यांचा वैचारिक जिल्हा आहे. या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून एक चांगला आणि वैचारिक असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे व्हिजन असणे गरजेचे आहे. त्याला आमचा पाठिंबा असेल.

कोणता तरी भ्रष्ट अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात येणे हे घातक आहे. जिल्ह्याला प्रगतिपथावर काम करणारा जिल्हाधिकारी हवा आहे. कोणत्याही भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची वर्णी येथे लावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आम्ही हाणून पाडू. शिवाय त्यासाठी आम्ही रस्त्यावरही उतरू, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT