Satej Patil_Gokul Election 
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil: सतेज पाटलांनी गोकुळचा निर्णय घेतला, आघाडीचं नाव ठरलं! एका रात्रीत पत्रही फिरवलं

Satej Patil: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

Rahul Gadkar

Satej Patil: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची या निवडणुकीत काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुती म्हणून लढण्याचे यापूर्वीही स्पष्ट केले आहे. त्यानंतर सतेज पाटील यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत एका रात्रीत गोकुळ निवडणुकीच्या घडामोडीत पहिले पाऊल टाकले आहे. महायुतीचे कधी ठरेल ते ठरेल पण त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आतापासून तयारी सुरु केली आहे. आमदार सतेज पाटील यांच्याकडून पॅनेलच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यासंदर्भात पत्रक काढून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

गोकुळ दूध संघाच्या मागील निवडणुकीत महाडिक गटाची २५ वर्षाची सत्ता उलथवून टाकत आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ता काबीज केली होई. पण सध्या राजकीय समीकरण बदल्याने मंत्री हसन मुश्रीफ हे महायुती आणि आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व करतात. मात्र दोघांची मैत्री पाहता मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील पॅनेलच्या नावाची घोषणा केली आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असे नाव देण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्रक संस्था प्रतिनिधींना देण्यास सुरवात केली आहे.

काय म्हटलं आहे पत्रकात?

कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हा ऊस, दूध आणि उद्योगामुळे झालेला आहे. यामुळेच महाराष्ट्र राज्यामध्ये दरडोई उत्पन्नात कोल्हापूरचा सहावा क्रमांक लागतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासामध्ये आनंदराव पाटील-चुयेकर यांनी प्रगतीपथावर नेलेला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था आहे. साडेपाच लाख शेतकऱ्यांना दर दहा दिवसाला 80 कोटी रुपये दुधाचे बिल देणारी ही संस्था आहे.

गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या पाच वर्षात गोकुळच्या माध्यमातून साडेपाच लाख शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मी घेतली आहे. ग्रामीण भागातील माता-भगिनी आणि शेतकरी यांचे अर्थकारण गोकुळवर अवलंबून आहे. अशा वेळी गोकुळ दूध संघाची सत्ता एक विचाराने काम करणाऱ्या चांगल्या लोकांच्या हाती असणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी दूध संस्थेच्या माध्यमातून योग्य व्यक्तीच्या नावावर ठराव करणे, या ठरावधारकाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये भविष्य काळात गोकुळ टिकला पाहिजे, यादृष्टीने चांगली भूमिका घेणे महत्वाचे आहे.

पक्षीय राजकारणात न अडकता गेल्या पाच वर्षांमध्ये गोकुळ चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण गेले तीन महिने महायुतीमध्ये सुरु असलेला वाद आपण सर्वजण अनुभवत आहात. त्यामुळे गोकुळच्या होणाऱ्या या निवडणुकीकडे पक्षीय भूमिकेतून न पाहता लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची ही व्यवस्था टिकली पाहिजे, अशा पद्धतीने याकडे पाहणे आवश्यक आहे. म्हणून अशी व्यापक भूमिका असणाऱ्या सभासदाच्या नावे आपल्या संस्थेचा ठराव करावा, ही विनंती मी आपल्याला करतो. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेऊन मी अनेक लढायांना आपल्यासारख्या स्वाभिमानी सभासदांच्या पाठबळावर सामोरा गेलो आहे. यावेळी सुद्धा आपण सर्वजण मला साथ द्याल, असा विश्वास वाटतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT