Kolhapur vidhansabha Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापुरात भाजपची दुर्दशा? 'या' नेत्याने उधळले मनसुबे...!

Kolhapur vidhansabha Election political analysis : गेले असून गेल्या दहा वर्षात भाजपने जे कमावले, ते या राज्यातील सत्ताबदलाने निवडणुकीच्या तोंडावर गमावले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का?

Rahul Gadkar

Kolhapur political analysis : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट देशात आली. विधानसभा निवडणुकीत हे तेच चित्र पाहायला मिळाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दोन आणि शिवसेनेचे सहा असे आठ युतीचे आमदार निवडून आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा भाजपमय करण्याची स्वप्ने अनेक वरिष्ठ नेत्यांनी पाहिली. त्यासाठी अनेक मातब्बरांची इन्कमिंग भाजपमध्ये झाले. पण अवघ्या पाच वर्षातच म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा आकडा झिरो झाला.

तर शिवसेनेचा आकडा एक वर थांबला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केलेली संघटन बांधणी भाजपला या पाच वर्षात मारक ठरली. तर मागील पाच वर्षात राज्यात झालेले सत्ताबदल, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अनास्था भाजप बॅकफूटवर जाण्यास कारणीभूत ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दोन धक्के मिळाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ही भाजप बॅकफूटवर गेले असून गेल्या दहा वर्षात भाजपने जे कमावले, ते या राज्यातील सत्ताबदलाने निवडणुकीच्या तोंडावर गमावले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात चांगले दिवस आले. कोल्हापूर जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती होती. भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याने पहिल्यांदाच दोन आमदार आणि शिवसेनेला सहा आमदार दिले. मिळालेल्या यशामुळे कोल्हापूर जिल्हा भाजपमय करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे, माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल देसाई, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महाडिक गट, चंदगडचे शिवाजी पाटील यांचा भरणा झाला. जिल्ह्यात भाजपला चांगले दिवस येतील अशी आशा यानिमित्ताने निर्माण झाली.

मात्र 2019 नंतर या मनसुब्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी सुरुंग लावले. जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसची केलेली संघटन बांधणी ने भाजपला रोखून धरले. त्यामुळे 2019 च्या सभा निवडणुकीत भाजपला नारळ फोडता आला नाही. तर शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप कोल्हापूर जिल्ह्यासाठी आग्रही होते. मात्र जागा वाटपात गोची निर्माण झाल्यानंतर ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. त्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली आपल्याच पायावर दगड मारून घेतला. कागल, चंदगड, इचलकरंजी, या हक्काच्या मतदारसंघात फटका बसला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला चांगले दिवस येतील अशी आशा होती. कारण कोल्हापूर दक्षिण सोडल्यास कागल, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी आणि कोल्हापूर उत्तर मध्ये भाजप स्वतःची उमेदवार उभे करतील अशी कार्यकर्त्यांना देखील आशा होती. त्यामुळे अनेक इच्छुकांनी स्वबळाची तयारी ठेवत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (shivsena) अंगावर घेत पाच वर्ष मतदारसंघ बांधून ठेवला होता. मात्र सद्य परिस्थिती पाहता महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असल्याने याच प्रमुख भाजप कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गोची तयार झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याने ज्याचा विद्यमान आमदार त्याची ही जागा हे सूत्र ठरल्याने कागल, चंदगड, राधानगरी, कोल्हापूर उत्तर, इचलकरंजी, विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्यापाठोपाठ शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी देखील पक्षाला नारळ देत महाविकास आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. राहुल देसाई यांचा पक्ष अजून निश्चित झाला नसला तरी ते महायुतीच्या विरोधात असतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे यंदा देखील जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व दिसेल याची शक्यता फार कमीच आहे.

गेल्या दहा वर्षात भाजप वाढीचा प्रयत्न सुरू असला तरी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस वाढीला भर दिला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत धरून जिल्ह्यात सत्ता केंद्र असलेल्या सहकारी संस्था आपल्या ताब्यात घेण्यात भर दिली. गोकुळ, कोल्हापूर जिल्हा बँक, महानगरपालिका यावर सत्ता ठेवत तालुका तालुक्यात संघटन बांधणीवर भर दिला आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांचा चेहरा देत केवळ जिल्ह्यात नव्हे राज्यात स्वतःची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकटे सतेज पाटील भाजपला चार मतदारसंघात रोखू शकतील हे चित्र आहे.

शिवाय गेल्या दहा वर्षात तीन वेळा कोल्हापुरात दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे विरुद्ध पक्षांनी भाजपलाच या मुद्द्यावरून घेरले आहे. शिवाय वाढती महागाई, पुरोगामी विचार, संविधान बदल असे विविध मुद्द्यांना पुढे ठेवेत भाजप बद्दल नाराजी जनतेच्या मनात वाढवण्याची यशस्वी चाल काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT