A. Y. Patil, Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : पाटलांच्या नागपूर दौऱ्याने मुश्रीफांच्या गटात खळबळ...

A. Y. Patil vs Hasan Mushrif : ए. वाय. पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा

Rahul Gadkar

Kolhapur News : गेल्या तीन ते चार वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये होत असलेली घुसमट आणि वाट्याला येणारी निराशा यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. बिद्री कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, माजी आमदार के पी पाटील यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतर राष्ट्रवादीतला गट नाराज आहे. अशातच ए वाय पाटील यांनी नुकताच नागपूर दौरा केल्याने कोल्हापूर राष्ट्रवादीच्या गटात खास करून पालकमंत्री मुश्रीफ यांच्या गटात खळबळ आहे.

ए वाय पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे हातातील घड्याळ काढून कमळ घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राधानगरी तालुक्यात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वी ए वाय पाटील यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे समरजीत सिंह घाटगे हे उपस्थित असल्याची माहिती आहे. "मात्र माझ्या कामानिमित्त मी भेट घेतली असून भाजप प्रवेशाबद्दल कोणतीच चर्चा झाली नसल्याचे ए.वाय. पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले".

सूत्रांच्या माहितीनुसार, बिद्रीच्या निवडणुकीनंतर आभार मेळाव्यात ए वाय पाटील यांनी राष्ट्रवादीत आपले खच्चीकरण होत असल्याची खंत कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांनी आपल्याला जो पक्ष न्याय देईल त्याच्या मागे राहणार असल्याचेही सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय पक्का केला होता. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी ए वाय पाटील यांची मनधरणी केली होती.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला होता. बिद्रीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी दबाव टाकल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ए. वाय. पाटील यांनी दंड थोपटले. वेळोवेळी भाषणात त्यांनी मंत्री मुश्रीफ आणि माजी आमदार के पी पाटील यांच्या बद्दलची उघड नाराजी व्यक्त केली होती.

ए.वाय. पाटील यांच्या पडत्या काळात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची नागपुरात भेट घेतल्याची माहिती आहे. महामंडळ किंवा विधान परिषदेवर घेण्यासाठी प्रयत्न असल्याचेही सांगितले जाते. विधान परिषद देत असतीलच तरच भाजपचा पर्याय स्वीकारावा असं कार्यकर्त्यांचे मत आहे. पण भाजप महामंडळ देणार की विधानपरिषदेवर घेणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT