laxman mane
laxman mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

लक्ष्मण मानेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर राष्ट्रद्रोहाचा आरोप : राज्यपाल कोश्यारींना ठरविले आरएसएसचे

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

Shrirampur : राष्ट्रगीत सुरू असताना मुख्यमंत्री उभा राहत नाही अशा विधीमंडळामध्ये मी निवडून जाऊ का असा प्रश्न उपस्थित करून हा राष्ट्रद्रोह आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्यपाल शेजारी उभे असताना यांना राष्ट्रगीताचे गांभीर्य नाही. तसेच राज्यपालाच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती आरएसएसचा अजेंडा चालविते. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर अशिक्षित माणूसही ही उभा राहतो एवढी अक्कलही मुख्यमंत्र्याला नसावी का, असा थेट हल्ला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी चढविला.

श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी नगरसेवक शामलिंग शिंदे, मल्लू शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी निषेध नोंदविताना घटनात्मक पेच निर्माण झाल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात जे काही सुरू आहे, त्याबाबत देशातील जनता न समजण्याइतकी अनभिज्ञ नाही. कालच्या निकालावरून असे दिसून येते की, यांना पुढील अडीच वर्ष हा घोळ असाच सुरू ठेवायचा आहे, असा 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी केला.

राज्यातील सरकार बेकायदेशीर

ते म्हणाले, राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे. जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत कोणताही खर्च करण्याचा व नव्या योजना राबविण्याचा यांना अधिकार नाही, असे केल्यास यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. मात्र, याविषयी कोणी बोलले तर त्याच्यामागे ईडी लावली जाते. शरद पवार व कुटुंबीय ही यापासून सुटले नाही, असा आरोप त्यांनी केला.

बंडाशिवाय मोदी हटणार नाही

लोकशाही हायजॅक केली असून श्रीमंत लोक निवडून जातील. कष्टकरी, शेतकरी यांना यापुढे तेथे जागा नाही. पालिकेत निवडून येण्यासाठी काही कोटी रुपये मोजावे लागतात, असा आरोप त्यांनी यावेळी केला. शहाण्या माणसाने क्रांतीला तयार राहायला पाहिजे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद बघता माणसं विरोधात उभी राहयला लागले आहेत. 'राहुल' याचे फक्त प्रतीक आहे. उठाव , बंड झाल्यावरच मोदी बाजूला जातील, अन्यथा नाही. 1857 व अलीकडेच श्रीलंकेत झालेल्या बंडामुळे राज्यकर्त्यांना देश सोडून पळून जावे लागले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT