Sharad Koli-Ganesh Wankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Shiv sena : सोलापूरच्या शिवसेनेत उफाळला नेतृत्वाचा वाद; जिल्हाप्रमुख म्हणाले ‘माझे नेतृत्व मातोश्रीवर...’

Sharad Koli Vs Ganesh Wankar : मेळाव्याची माहिती देताना एका पत्रकाराने, ‘उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात आपण दक्षिण सोलापूरच्या मेळाव्यासाठी स्थानिक पदाधिकारी पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि उत्तम प्रकाश खंदारे यांची पक्षात उपस्थिती आहे. पण ते अबोल का आहेत, असा सवाल विचारला होता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 10 September : दक्षिण सोलापूरमधील शिवसैनिकांच्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेतृत्वाचा वाद उफाळून आला. पत्रकाराच्या एका प्रश्नावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर हे प्रचंड चिडले आणि आपण थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केले आहे, येथील कोणाचे नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच नाही, असे सोलापूरमधील स्थानिक नेतृत्वाला ठणकावले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे व्यासपीठावरील नेतेमंडळींची एकच तारांबळ उडाली. मात्र माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे आणि जिल्हा संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मध्यस्थी करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेतील (Shivsena) नेतृत्वाचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर मतदार संघात (South Solapur Constituency) येत्या गुरुवारी (ता. 12 सप्टेंबर) शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्याची माहिती देण्यासाठी शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती, त्या पत्रकार परिषदेत नेतृत्वाचा वाद उफाळून आला.

या मेळाव्याची माहिती देताना एका पत्रकाराने, ‘उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात आपण दक्षिण सोलापूरच्या मेळाव्यासाठी स्थानिक पदाधिकारी पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि उत्तम प्रकाश खंदारे यांची पक्षात उपस्थिती आहे. पण ते अबोल का आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता.

पत्रकाराच्या त्या प्रश्नावर जिल्हाप्रमुख गणेश वानकर हे प्रचंड चिडून उठून उभे राहिले. ‘आपण थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. येथील कोणाचे नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे गणेश वानकर यांनी या वेळी स्थानिक नेत्यांना नाव न घेता ठणकावले. त्यांचा रोख उपनेते शरद कोळी यांच्याकडे होता.

गणेश वानकर आक्रमक झाल्याचे पाहून जिल्हा संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी बसून असलेले शरद कोळी मात्र शांतच होते, त्यांनी यावेळी कुठलीही भूमिका मांडली नाही

एकत्रपणे लढणार का?

आजची पत्रकार परिषद ही शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी आहे, तेवढेच प्रश्न विचारा असे सांगून गणेश वानकर यांनी पत्रकार परिषद थांबवण्याचा सल्ला दिला. मात्र, पत्रकार परिषदेतच शिवसेनेतील नेतृत्वाचा वाद सर्वांसमोर आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकत्रपणे लढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT