Sangola, 09 September : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही सांगोला मतदारसंघातून विधानसेसाठी शड्डू ठोकला आहे, त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे इच्छूक डॉ. बाबासाहेब आणि अनिकेत या देशमुख बंधूंचे टेन्शन वाढणार आहे. कारण मागील निवडणुकीत ही जागा शिवसेनेने लढवली होती, त्यामुळे आमचा सांगोल्यावर दावा आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी जाहीर केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांची आज सांगोल्यात पत्रकार परिषद झाली. त्या परिषदेत शिंदे यांनी सांगोल्यातून (Sangola) आम्ही विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
मागील निवडणुकीत शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होत. त्या वेळी शिवसेना एकत्र होती. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले, त्यामुळे महायुतीकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत शेकापने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. त्यामुळे विधानसभेला सांगोल्याची जागा महाविकास आघाडीकडून शेकापला सोडली जाईल, अशी धारणा असताना आता शिवसेनेनेही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.
शिवसेनेच्या नव्या पवित्र्यामुळे महाविकास आघाडीतही मतदारसंघावरून धूसफूस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनीही निवडणुकीची तयारी चालवली आहे, त्यामुळे महायुतीप्रमाणे आता महाविकास आघाडीत शिवसेनेच्या भूमिकेमुळे पेच निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, सांगोला ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेना विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आम्ही लवकरच शिष्टमंडळासह भेट घेणार आहे. आमचा उमेदवारही तयार आहे, असल्याचे जिल्हाप्रमुख शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडून आणले, त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवली जाईल. सांगोल्यात कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा करण्यात येत आहे. पण या निधीला टक्केवारीचे ग्रहण लागल्याने मतदारसंघातील कामे ही निकृष्ट दर्जाची झाली आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.
शेकापच्या काही नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नाही
शेतकरी कामगार पक्षातील काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला नाही. शेकापच्या काही नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांशी संधान साधले होते. त्याबाबत आम्ही महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारही केली आहे. सांगोला तालुक्यातील अवैध धंदे आणि भ्रष्टाचाराकडे आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या नेतेमंडळींचे दुर्लक्ष आहे, त्याविरोधात शिवसेना आवाज उठवेल, असेही जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.