Raju Shetti, Uddhav Thackeray  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : शेट्टींचं ठरेना, हातकणंगलेच्या मैदानात ठाकरे गटाची पुन्हा चाचपणी, तीन माजी आमदारांमध्ये...

Rahul Gadkar

Hatkanangale News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. त्यानंतरही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा गुंता अधिक वाढत आहे. शेट्टींनी ठाकरे गटाचा पाठिंबा मागितला आहे. मात्र, महाविकास आघाडीत जाण्यास त्यांनी आजही विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील तीन माजी आमदारांनी सोमवारी ( 18 मार्च ) गुप्त बैठक घेत या ठिकाणी कोणता उमेदवार देता येईल, याची चर्चा केली.

महाविकास आघाडीकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ( Hatkanangle Lok Sabha Constituency ) उमेदवार कोण? यासाठी सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पक्षाच्या नेत्यांच्या गुप्त बैठका घेतल्या. दिवसभरात त्यांनी तीनही माजी आमदारांशी चर्चा करून आढावा घेतला. दिवसभर कोल्हापुरात थांबून हातकणंगलेतील उमेदवाराबाबत अंदाज घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (ता. १९) किंवा गुरुवारी (ता. २१) याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती दुधवडकर यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज ( Shahu Maharaj ) उमेदवार असतील हे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाला हातकणंगले येथील एकच जागा राहिली आहे. त्या ठिकाणी उमेदवार कोण द्यायचा, हे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) ठरविणार आहेत. तेथे स्वाभिमानी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी हे निवडणूक लढणार आहेत. मात्र, त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मागितला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाठिंबा नाही तर ‘एकला चलो’चा नारा शेट्टींनी दिला आहे.

त्यामुळे अचानक लोकसभेला हातकणंगलेतून कोणाला रिंगणात उतरवायचे, याबाबत गेली काही दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेस आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात यापूर्वी उमेदवारीबाबत चर्चा झाली. तेव्हा माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या नावांबाबत चर्चा झाली होती. पुन्हा एकदा डॉ. मिणचेकर, सत्यजित पाटील आणि उल्हास पाटील या माजी आमदार आणि जिल्हा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णय झाला नाही.

"माजी आमदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी आज दिवसभर चर्चा केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असणार याबाबतची माहिती घेतली आहे. माजी आमदारांकडून त्यांची मते जाणून घेतली आहेत. उद्या किंवा गुरुवारी (ता. २१) याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील," असं अरुण दुधवडकर यांनी सांगितलं.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT