Uddhav Thackeray Meet Chhatrapati Shahu Maharaj  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे - शाहू महाराजांची गळाभेट; संभाजीराजेंची अनुपस्थिती, कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

Rahul Gadkar

Kolhapur Political News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. 21) शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आले होते. त्यांनी कसबा बावडा येथील नवीन राजवाडा येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गाडीतून उतरल्या उतरल्या शाहू महाराजांची गळाभेट घेतली. या वेळी मात्र संभाजीराजे छत्रपती उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. Uddhav Thackeray

या वेळी झालेल्या भेटीत ठाकरे आणि शाहू महाराज छत्रपती (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. राजर्षी शाहू महाराज आणि ठाकरे कुटुंबाचे पूर्वीपासून ऋणानुबंध कायम आहेत. आज महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसेना ठाकरे गट पूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. महाराजांना विजयी केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा शब्द ठाकरेंनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) म्हणजे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. आम्ही महाराजांना वचन दिले आहे. आम्ही प्रचाराला येणार आहोत. शिवाय त्यांच्या विजयाच्या सभेलादेखील आम्ही उपस्थित राहणार आहोत. या मागे माझाही स्वार्थ आहे. पुढील संघर्षात महाराजांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. जे काही ठरले आहे ते आम्ही स्पष्ट बोललो आहोत. आता जे काही बोलायचे ते मी प्रचारातच बोलेन, असे सूचक विधान करत ठाकरेंनी विरोधकांची धाकधूक वाढवली.

दरम्यान, शाहू महाराज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत झालेल्या चर्चेनुसार, महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यभरात अनेक ठिकाणी मेळावे घेण्यात येणार आहेत. यातील काही मेळाव्याच्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार आणि पुरोगामी विचाराचे पाईक म्हणून आपण या मेळाव्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहावे, अशीही विनंती ठाकरे यांनी केल्याचे समजते.

संभाजीराजेंची अनुपस्थिती

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. या भेटीवेळी युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, युवराज संभाजीराजे छत्रपती यांची अनुपस्थिती जाणवली. ते ठरलेल्या नियोजनानुसार राधानगरी येथे प्रचारासाठी गेल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, पत्रकार परिषदेला खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार मालोजीराजे, संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, नितीन बानुगडे, पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT