Devendra Fadnavis-Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha Constituency : माढा कोण लढणार? अजित पवारांची राष्ट्रवादी की भाजप?

माढा लोकसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विधानसभेचे तीन व विधान परिषदेचा एक असे चार आमदार आहेत.

प्रमोद बोडके

Solapur Politic's : राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची ओळख होती. भाजपने २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला काबीज केला. आगामी २०२४ मध्येही या मतदार संघात भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा सरळ. सामना होण्याची शक्यता होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीत पडलेली फूट, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला मिळालेला सत्तेचा वाटा, यामुळे माढा कोण लढणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Madha Lok Sabha constituency Will contest BJP or Ajit Pawar's NCP?)

माढा (Madha) मतदार संघात दोनदा जिंकलेली राष्ट्रवादी (NCPअजित पवार गट) ही जागा लढवणार की पहिल्यांदा जिंकलेली भाजप (BJP) येथून निवडणूक लढणार? हा येत्या काळात कळीचा मुद्दा ठरू शकतो. माढा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा २००९ पासून २०१९ पर्यंत प्रत्येक वेळी पडत आलेला आहे. तसाच तो २०२४ मध्येही कायम असणार आहे.

माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे, माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते, विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील ही भाजपची या मतदारसंघातील ताकद आहे. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण, विधान परिषद सदस्य रामराजे नाईक निंबाळकर ही या मतदार संघातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची ताकद आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे शिंदे शिवसेनेकडे असल्याने त्यांचा राजकीय हातचा म्हणून उपयोग भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांसाठीही होऊ शकतो.

माढा लोकसभा मतदार संघात (Lok sabha) अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विधानसभेचे तीन व विधान परिषदेचा एक असे चार आमदार आहेत. भाजपकडे विधानसभेचे दोन व विधान परिषदेचे एक असे तीन आमदार आहेत. माढ्याची खासदारकी जरी राष्ट्रवादीने गमावली असली तरीही या मतदार संघात सध्या भाजपपेक्षा अजित पवार यांच्या गटाची ताकद मोठी आहे. त्यामुळे माढ्याच्या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा अधिक प्रबळ राहण्याची शक्यता आहे.

माढ्याची जागा जर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळाली तर शरद पवार यांची राष्ट्रवादी माढ्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एकेकाळी या मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद मोठी होती. या मतदार संघातील बहुतांश आमदार, प्रमुख पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला माढा लोकसभा मतदार संघात माण-खटावचे प्रभाकर देशमुख यांच्या शिवाय एकही प्रभावी चेहरा राहिलेला नाही.

करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला, फलटण या पाचही मतदार संघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एकही प्रभावी चेहरा राहिलेला नाही. या लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या राजकारणातून रिटायर्ड झालेल्या चेहऱ्यांवर किंवा एकदम नवख्या चेहऱ्यांवर आगामी राजकारण करावे लागणार आहे. कमी काळात नवे नेतृत्व उभा करण्याचे मोठे आव्हान सध्या शरद पवार यांच्यासमोर आहे.

परंपरा पराभूतांच्या मंत्रीपदाची

सन २००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदार संघाचा इतिहास रंजक आहे. शरद पवार येथून २००९ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले अन् केंद्रात कृषी मंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपकडून सुभाष देशमुख व रासपकडून महादेव जानकर निवडणूक लढले अन्‌ पराभूत झाले. त्यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत माढ्यातून राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील खासदार झाले. त्यांच्या विरोधात स्वाभिमानी-भाजपच्या महायुतीतून सदाभाऊ खोत निवडणूक लढले आणि पराभूत झाले. माढ्यातून पराभूत झालेले सुभाष देशमुख, महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत हे तिघेही नंतर २०१४ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले.

आता संजय शिंदेंना मंत्रिपद मिळणार का?

माढ्यातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय शिंदे पराभूत झाले. संजय शिंदे करमाळ्यातून अपक्ष आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये २०१९ मध्ये संजय शिंदे यांना संधी असूनही मंत्रिपद मिळाले नाही. अजित पवार पवार गोटात गेलेले संजय शिंदे पुढील विस्तारात मंत्रीपदाची संधी मिळून माढ्यातील पराभूतांची मंत्रीपदाची परंपरा कायम राहते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT