Ranjeetsinh Naik Nimbalkar, Chandrashekhar Bawankule, Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha Constituency : महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप ? महायुतीला धक्का; 'हा' बडा नेता तुतारी हाती घेणार

Deepak Kulkarni

Madha Loksabha Election News : डेंजर झोनमध्ये जागा आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेमंडळींचा विरोध डावलून भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांना होणारा विरोध दिवसागणिक वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी नाराज नेतेमंडळींसोबत बैठक घेतल्यानंतरही माढा मतदारसंघातला वाद निवळलाच नाही. या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता माढ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर हे उत्सुक होते. मात्र, महायुतीत भाजपने ही जागा आपल्याकडेच ठेवत तिथे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांनाच पुन्हा उमेदवारी दिली. यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, माढ्यात उमेदवार बदलण्याची मागणी केली. पण या जागेवरून भाजप उमेदवारी मागे घेण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याचमुळे माढ्यात महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Madha Lok Sabha Constituency) डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. विशेषतः धैर्यशील (Dhairyashil Mohite Patil ) आणि जयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मात्र,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजप सोडायला तयार नाहीत, त्यामुळे माढ्यातून तुतारीवर नेमकं लढणार, याची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर धैर्यशील यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता येऊ लागली होती.

धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच 9 एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील 9 तारखेला प्रवेश करून 15 तारखेला प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. अमावस्याच्यापूर्वी निर्णय नको म्हणून गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये माढ्याचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Nimbalkar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत, तर महादेव जानकरांनी पवारांची ऑफर नाकारत महायुतीसोबत गेल्याने महाविकास आघाडीचाही उमेदवार अद्याप ठरत नाही. नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी (ता. 3 ) ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर गुरुवारी (ता. 4 ) दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले. त्यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे माढ्याबाबत पवारांच्या मनात नेमकं काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रवीण गायकवाडही उत्सुक...

मोहिते पाटलांचा तुतारीचा निर्णय होत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा शरद पवारांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटलांनी तुतारीवर लढावे अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे माढ्यात नवा ट्विस्ट आला आहे. माढ्याच्या उमेदवारीबाबत पवार आणि गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT