Solapur, 4 April : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये माढ्याचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत, तर महादेव जानकरांनी पवारांची ऑफर नाकारत महायुतीसोबत गेल्याने महाविकास आघाडीचाही उमेदवार अद्याप ठरत नाही. नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी (ता. ३ एप्रिल) ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर आज (ता. ४ एप्रिल) दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले. त्यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे माढ्याबाबत पवारांच्या मनात नेमकं काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Madha Lok Sabha Constituency) डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. विशेषतः धैर्यशील (Dhairyasheel Mohite Patil ) आणि जयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजप सोडायला तयार नाहीत, त्यामुळे माढ्यातून तुतारीवर नेमकं लढणार, याची उत्सुकता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माढा लोकसभा मतदारसंघ धनगर समाजाला सोडण्याचे सूतोवाच करून त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना उमेदवारी देण्याची ऑफर शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली होती. पवारांसोबत झालेल्या चर्चेतून जानकर यांनी माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. मात्र, सामाजिक समीकरण लक्षात घेऊन महायुतीने जानकर यांना आपल्या गोटात ओढून घेत त्यांना परभणीतून उमेदवारी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीचा माढ्याचा हातचा उमेदवार गेला.
दुसरीकडे, मोहिते पाटलांवर माढा लोकसभा मतदारसंघातून फिरताना शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी हे चिन्ह हाती घेण्याचा प्रचंड दबाव वाढत आहे. खुद्द जयसिंह मोहिते पाटील यांनीही धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे जाहीर केले होते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. ते येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
एकीकडे, मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा होत असताना आज सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हेही उपस्थित होते. त्यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पवार नेमकं कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार, हे पाहावे लागणार आहे.
बारामतीचे गणित
दरम्यान, माढ्यातून धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे पवारांच्या मनात आहे. त्यासाठी त्यांनी पहिला डाव जानकर यांच्यावर लावला होता. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी तो डाव उधळून लावला. आता मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील आणि सांगोल्याचे डॉ. अनिकेत देशमुख हे धनगर समाजातील प्रबळ नेते आहेत. बारामतीचे गणित जुळवण्यासाठी पवार या दोन नेत्यांपैकी कोणाला तिकीट देणार की, पुन्हा मोहिते पाटील यांच्या गळ्यात उमेदवारी माळ घालणार, याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.