Babanrao Shinde-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Babanrao Shinde : बबनदादा अजितदादांनाही धक्का देणार; मुलाला माढ्यातून अपक्ष निवडणुकीला उतरवणार...

Madha Assembly Constituency : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दोनदा भेटलो आहे. त्यावेळी त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. उमेदवारीचा शब्द त्यांच्याकडून अद्याप कोणालाही देण्यात आलेला नाही.

भारत नागणे

Pandharpur, 04 October : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्यांच्यासाठी माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा काढली, ते आमदार बबनराव शिंदे हे अजितदादांची साथ सोडण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तर माझा मुलगा रणजितसिंह शिंदे हा माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवेल, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे माढ्यात महायुतीचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पंढरपूरमध्ये आलेल्या आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार बबनराव शिंदे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय उलथापालथीना वेग आला आहे.‌ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळत आहेत. माढ्यात आज अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

कारण, कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आणि महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचा आमदार शिंदे यांनी निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे या दोन बंधूंनी शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या गोटात जाणे पसंत केले होते. लोकसभा निवडणुकीत माढ्यातून आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात जनमताचा कौल विरोधात गेला. त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेऊन मुलाच्या उमेदवाराची मागणी केली.

आमदार शिंदे यांना उमेदवारी देण्यास माढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना होणारा विरोध पाहून शिंदे यांनी आपला मुलगा रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष निवडणूकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दोनदा भेटलो आहे. त्यावेळी त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. उमेदवारीचा शब्द त्यांच्याकडून अद्याप कोणालाही देण्यात आलेला नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर रणजितसिंह शिंदे हे तुतारीवर निवडणूक लढवतील. पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर माझा मुलगा रणजितसिंह हा माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे माढ्यात महायुतीचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT