Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकीकडे अजित पवार गटाने उमेदवारी मिळाल्याचे सांगून प्रचारास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी आम्हालाच तिकीट मिळणार असे सांगून संपर्क मोहीम राबवली आहे. तसेच शिंदे गटानेही भेटीगाठी सुरू केल्या असून नरेंद्र पाटीलही इच्छुक आहेत. त्यामुळे सातारा महायुतीत लोकसभेवरून त्रांगडं झाले असून प्रमुख नेत्यांकडून दबाबाचे तंत्र अवलंबत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara) महायुती कोणाच्या वाटेला जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. एकीकडे हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळाला असे सांगितले जात आहे. त्या दृष्टीने अजित पवार गटाचे जिल्ह्यातील नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी उदयनराजेंनाच तिकीट मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेत दबावतंत्र अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
खासदार उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) शनिवारी रात्री पाली (ता. कराड) येथे मेळावा घेतला. तेथे त्यांनी भाजप नेते मनोज घोरपडे हेच आगामी काळात कराड उत्तरचे आमदार होतील, असे भाकीत केले. त्यानंतर त्यांनी जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संपर्क मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सकाळी साताऱ्यातील देशमुखनगर येथे मेळावा पार पडला. एकूणच सातारा लोकसभेसाठी उदयनराजे यांनाच भाजपकडून तिकीट मिळावे, यासाठी जोर लावण्यात येत आहे.
पुरुषोत्तम जाधव-शिवेंद्रराजे भेट
सातारा लोकसभा ही जागा शिवसेनेची आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही दंड थोपटले आहेत. या जागेसाठी आपण इच्छुक असून, लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची भूमिका जाधवांनी स्पष्ट केली. त्यातूनच त्यांनी शनिवारी सकाळी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. पण, ही चर्चा लोकसभेच्या निवडणुकीची नसल्याचे त्यांनी सांगत वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेतल्याचे जाधवांनी सांगितले आहे.
नरेंद्र पाटलांचीही आग्रही भूमिका
माथाडीचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनीही आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची साताऱ्यात रविवारी भेट घेतली. या भेटीबद्दल त्यांनी आमच्या माथाडीच्या संदर्भातील कामासाठी भेटल्याचे सांगितले. तसेच लोकसभेसाठी मी इच्छुक असलो तरी अद्याप हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला हे निश्चित नाही. खासदार उदयनराजे हे राज्यसभेचे खासदार असून त्यांची मुदत संपलेली नाही याकडे लक्ष वेधत पाटलांनी ही जागा भाजपला मिळाल्यास आणि पक्षाने संधी दिल्यास लढण्यास तयार आहे, अशी गुगलीही टाकली.
दिवसेंदिवस तिढा वाढला
सातारा लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या महायुतीत दिवसेंदिवस वाढत आहे. हा मतदारसंघ कोणाला सुटणार, यावर या इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे. अजित पवार गटाने सुरू केलेली प्रचार मोहीम आणि उदयराजेंनी घेतलेली भूमिका पाहता महायुतीच्या दोन्ही पक्षांत सध्या रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महायुतीचा सातारा लोकसभेचा उमेदवार नेमका कोण, याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. महायुतीतील साताऱ्या जागेचा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.