Babanrao Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti MLA Meeting : महायुतीच्या आमदारांच्या बैठकीनंतर बबनदादा म्हणाले, आमचं ठरलंय...

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 March : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा एकदिलाने, मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे, असं आमचं ठरलंय, अशा शब्दांत माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगून निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

माढ्यातून भाजपचे तिकिट न मिळाल्याने मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. त्यातूनच अकलूजच्या (Akluj) शिवरत्न बंगल्यावर काल जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर मोहिते पाटील यांची समजूत काढायला आलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांच्यासमोर मोहिते पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे माढ्याच्या तिकिटावरून भाजपमध्येच जोरदार धुमश्चक्री दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढ्यातून (Madha) सर्वाधिक मतांनी निडून येतील. कारण, महायुतीमधील सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत. मोहिते पाटील यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे तेही निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहतील, असे आमदार संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

मोहिते पाटील अकलूजमध्ये शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आज खासदार निंबाळकर यांनी आमदार संजय शिंदे यांच्या टेंभुर्णीतील फार्म हाऊसवर महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, शहाजी पाटील, जयकुमार गोरे, दीपक साळुंखे, कल्याणराव काळे यांच्यासह प्रमख नेतेमंडळी उपस्थित होते. त्यानंतर आमदार बबनराव शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला.

दरम्यान, माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनीही आपण भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले. मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असं सांगून निंबाळकर यांच्यासाठी सक्रियपणे प्रचार करणार असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT