Solapur, 29 October : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (ता. २९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित, एमआयएम या प्रमुख पक्षाच्या अधिकृत उमेदवारांंचाही त्यात समावेश आहे. पण, जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
विशेषतः महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी चार मतदारसंघात, तर महायुतीमध्ये दोन पक्षांनी तीन मतदारसंघात एकमेकांना आव्हान दिले आहे, त्यामुळे सोलापुरात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टेन्शन वाढणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत राज्यात चुरस आहे. मात्र, मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, माकप आणि मातब्बर अपक्षांच्या उमेदवारीमुळे राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची धडधड वाढवली आहे. सोलापुरात एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीतील अनेक मातब्बर समोरासमोर उभे ठाकले आहेत, त्यामुळे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीपुढे अडचणी वाढताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि पंढरपूर मंगळवेढ्यात बंडखोरी झाली आहे. पंढरपूर मंगळवेढ्याची जागा काँग्रेस पक्षाला सुटली आहे.
या मतदारसंघात काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, याची उत्सुकता असणार आहे.
सोलापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक बंडखोरीची चर्चा झाली आहे. कारण महाविकास आघाडीत शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर माजी आमदार दिलीप माने यांनी बंडखोरीचा इशारा देताच काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, शेवटपर्यंत त्यांना एबी फार्मच मिळू शकलेला नाही. त्याबद्दल माने यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्रागा केला.
याशिवाय सिद्धेश्वर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेले बाबा मिस्त्री हे प्रहार जनशक्ती पक्षाकडून पुन्हा दक्षिणच्या रणात उतरले आहेत.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ हा कम्युनिस्ट पक्षाला मिळावा, अशी माजी आमदार नरसय्या आडम यांची इच्छा होती. मात्र,महाआघाडीच्या नेत्यांकडून तो मतदारसंघ आडम यांना सोडण्यात आलेला नाही. काँग्रेसकडून शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना संधी देण्यात आल्याने आडम मास्तर यांनी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांनीही अपक्ष अर्ज भरलेला आहे.
सांगोला मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाला सुटेल, असे मानले जात असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) विरुद्ध शेकाप असा सामना रंगणार आहे.
भाजपला शिंदेंच्या शिलेदारांचे चॅलेंज
तीन मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मित्रपक्षाकडून आव्हान देण्यात आलेले आहे. यामध्ये सोलापूर शहर उत्तरमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी राजीनामा देऊन स्वराज्य पक्षाकडून भाजपचे विजयकुमार देशमुख यांना आव्हान दिले आहे.
शहर मध्य मतदारसंघात जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनीही शिवसेनेचा त्याग करत भाजपचे देवेंद्र कोठे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोलापूर दक्षिणमध्ये माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख उमेश गायकवाड, अण्णाप्पा सत्तुबर या दोघांनी दंड थोपटले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.