Mahesh Kote-Devendra Kote Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahesh Kote : महेश कोठेंचा पुतण्यासाठी त्याग?; ‘एकवेळ घरी बसेन; पण देवेंद्रच्या विरोधात ‘सोलापूर शहर मध्य’ मधून लढणार नाही’

Solapur City Central Assembly Election : माझा पुतण्या देवेंद्र हा खूप हट्टी आहे. त्याचा हट्ट मला लहानपणापासूच माहिती आहे, त्यामुळे माझा मुलगा प्रथमेश (माजी नगरसेवक) आणि पुतण्या देवेंद्र (माजी नगरसेवक) यांनी कोणता राजकीय निर्णय घ्यावा.

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 July : मी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहे. माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही. एक वेळ मी घरी बसेन; पण सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, अशी रोखठोक भूमिका सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांनी घेतली आहे. त्यामुळे महेश कोठे यांनी पुतण्यासाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून माघार घेतली की काय, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. सोलापुरातही मतदारसंघासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे एकाच मतदारसंघावर दावा करताना दिसून येत आहेत.

सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांचा विजय झाल्यानंतर या मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक (Assembly Election) लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे.

विशेषतः सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेससह मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडूनही दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघ नेमका कोणाला मिळणार आणि तिकिटाची लॉटरी कोणाला लागणार याची उत्सुकता आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस, ‘माकप’कडून दावे करण्यात येत असले तरी सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kote) यांनी मात्र पुतण्याच्या (देवेंद्र कोठे Devendra Kote) विरोधात निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. इच्छुक असणे यात काहीही गैर नाही.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. मात्र, देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही. एक वेळ घरी बसणे पसंत करेन; पण सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्रच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महेश कोठे यांनी घेतली.

दरम्यान, माझा पुतण्या देवेंद्र हा खूप हट्टी आहे. त्याचा हट्ट मला लहानपणापासूच माहिती आहे, त्यामुळे माझा मुलगा प्रथमेश (माजी नगरसेवक) आणि पुतण्या देवेंद्र (माजी नगरसेवक) यांनी कोणता राजकीय निर्णय घ्यावा, याबाबत हस्तक्षेप न करता त्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिले आहे, असेही महेश कोठे यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना केवळ 796 मते जास्त पडली होती. त्यानंतरही मतदारसंघातील सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन ‘सोलापूर शहर मध्य’मधून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची रांग आहे.

माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी तर लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभेची तयारी चालवली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार, नाना पटोले यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन शहर मध्य मतदारसंघाबाबत चर्चा केली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख यांनीही निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

माजी आमदार आडम यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी तौफिक शेख यांनी आपण सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे आडम यांना स्पष्टपणे सांगून टाकले. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदासंघ कोणाला सुटतो आणि आमदारकीच्या माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT