Mahesh Shinde, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon : ग्रामपंचायत रणांगणात महेश शिंदे, शशिकांत शिंदे भिडले

Kumthe कुमठे ग्रामपंचायतीसाठी आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन पॅनेल रिंगणात उतरली आहेत.

सरकारनामा ब्युरो

कोरेगाव : कुमठे (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक दोन दिवसांपासून संवेदनशील वळणावर येऊन ठेपलेली आहे. बुधवारी (ता. १४) रात्री आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रचार रॅलीविरुद्ध घोषणाबाजी, गाड्या फोडण्याची धमकी देण्यात आली. तर गुरुवारी (ता.१५) सायंकाळी गावातून एकाचे अपहरण करून त्याला मारहाण करून त्याच्याकडून आमदार महेश शिंदे यांनी आपल्याला पैसे वाटप करण्‍यास सांगितले, असे वदवून घेतल्याची नोंद येथील पोलिसात झाली आहे.दरम्यान, कुमठेसह अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत पैशाचे वाटप सुरू असून, संबंधितांना शोधून पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी रात्री कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांची भेट घेऊन केली आहे.

कोरेगाव तालुक्यामध्ये कुमठे ग्रामपंचायत ही कोरेगाव शहरालगत मतदान आणि लोकसंख्येने मोठी ग्रामपंचायत आहे. ही मोठी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी, यासाठी आमदार शशिकांत शिंदे, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे आदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत श्री ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेल रिंगणात उतरले आहे, तर बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्री ज्योतिर्लिंग ग्रामविकास परिवर्तन पॅनेल-माजी सैनिक संघटना हे पॅनेल ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात मिळवण्यासाठी रिंगणात ताकदीने उतरलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावामधील वातावरण खूपच संवेदनशील बनले असून ते थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोचले.

कुमठेत प्रचार सुरू असताना बुधवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास महेश शिंदे पुरस्कृत श्री ज्योतिर्लिंग ग्रामविकास परिवर्तन पॅनेल-माजी सैनिक संघटनेचा मी आणि किरण ज्ञानदेव जगदाळे, सुधीर शंकर जगदाळे, हणमंत पांडुरंग जगदाळे व इतर कार्यकर्ते गावात प्रचार करत होतो. आम्ही लक्ष्मी चौकात प्रचार करताना तेथे आमदार महेश शिंदे आले. तेथून त्यांच्यासह आम्ही सर्व मिळून गोपाळ मालोजी जगदाळे यांच्या वाड्यासमोरून प्रचार करत जात असताना गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलचे कार्यकर्ते तेथे आले.

जितेंद्र विलास जगदाळे, राजाभाऊ हणमंत जगदाळे, गोपाळ मालोजी जगदाळे, राजकुमार रमेश जगदाळे, विनोद गणपत जगदाळे, विशाल आनंदराव चव्हाण, शिवाजी भीमराव रोमन, दिलीप नानासाहेब जगदाळे, संभाजी मुगुटराव चव्हाण, वैभव भीमराव रोमन यांनी बेकायदा जमाव जमवून आमच्या पाठीमागे येऊन आमदार महेश शिंदे पुरस्कृत पॅनेलला उद्देशून ‘पन्नास खोके, एकदम ओके’ कोण आला रे कोण आला, गुवाहटीचा चोर आला’ अशा घोषणा देत आमदार महेश शिंदे यांनी गावात पाय ठेवायचा नाही, अन्यथा गाड्या फोडल्या जातील, अशा धमकी देत शिवीगाळ केल्याची फिर्याद या पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार ज्योतिर्लिंग ग्रामविकास परिवर्तन पॅनेल- माजी सैनिक संघटना पॅनेलचे उमेदवार संतोष गुलाब चव्हाण यांनी दिली आहे.

अपहरण करून मारहाण

दरम्यान, गुरूवारी (ता. १५) सायंकाळी कुमठे गावात प्रचार प्रक्रिया जोरदार सुरू असताना खटावमधून आलेल्या एकास सहा ते सात जणांनी मोटारसायकलवर बसवून नेवून गावातील हनुमान मंदिराजवळ व कुमठे-चंचळी रस्त्याकडेला असलेल्या दोन बंगल्यांत जोरदार मारहाण केल्याची नोंद येथील पोलिसात झाली आहे. याबाबत गणेश तानाजी हजारे (वय २७, रा. भवानी टेक, खटाव, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वैभव रोमन (पूर्ण नाव माहीत नाही) आणि रणजित भानुदास जगदाळे (दोघे रा. कुमठे, ता. कोरेगाव) आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार ते पाच जणांनी गुरुवारी सायंकाळी मला दुसऱ्या गावचा असताना आमच्या गावात प्रचार का करत आहेस, असे म्हणून मारहाण केली.

तसेच त्यांच्या मोटारसायकलवर बसवून चंचळी बाजूकडील सुमारे २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या बंगल्यात नेऊन काही वेळ डांबून ठेवून हाताने मारहाण केली. मारहाण व दमदाटी करत मी आमदार महेश शिंदे यांच्या सांगण्यावरून कुमठे गावात पैसे वाटण्यासाठी आलो असे वदवून घेतले आणि तसा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. मारहाणीत श्री. हजारे यांच्या तोंडावर, डोक्यात, पोटात आणि छातीवर मुका मार लागून दुखत असल्याने त्यांना येथील डॉ. गोसावी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी वैभव रोमन यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कपबशा वाटल्याची तक्रार

कुमठे गावात प्रचार वेगात सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार प्रवीण गुलाब जावळे, कार्यकर्ते भीमराव श्रीरंग रोमन, पोपट बुबाजी जगदाळे हे आज दुपारी साडेबारा वाजता गावाच्या वेशीवर प्रचार करत असताना त्यांना निवडणुकीतील विरोधी ज्योतिर्लिंग ग्रामविकास परिवर्तन पॅनेल- माजी सैनिक संघटनेचे सरपंचपदाचे उमेदवार संतोष गुलाब चव्हाण हे बलेरो (मक्सट्रक प्लस-एमएच ११- सीएच ९५८८) या वाहनातून त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या कपबशी मतदारांना लाच म्हणून वाटप करून मत मागताना आढळून आल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे.

शशिकांत शिंदेंची तक्रार

कोरेगाव तालुक्यात सुरू असलेल्या कुमठेसह अनेक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुकीत अमाप पैशाचे वाटप सुरू असून, संबंधितांना शोधून पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी काल गुरुवारी रात्री कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांची भेट घेऊन केली. पोलिस निरीक्षक श्री. सावंत यांच्यासमोर त्यांनी विरोधक निवडणुकीमध्ये पैसे कसे वाटप करतात, याचा पाढाच वाचला. कोरेगाव नगरपंचायत, खेड (ता.सातारा) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अमाप पैशाचे वाटप करण्यात आल्याचे नमूद करून त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अनेक गावांत अमाप पैशाचे वाटप सुरू असल्याची तक्रार करत त्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT