Satara ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Update : सातारा झेडपीत मोठी घडामोड : शिवसेना-राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सामील; पण...

Vishay Committee Members Election 2026 : सातारा जिल्हा परिषदेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्ता वाटप झाले. विषय समिती निवडीत एकत्र येत राजकीय विरोधकांमध्ये अनपेक्षित सहकार्य दिसून आले.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 18 April : सातारा जिल्हा परिषदेत मोठी घडामोडी घडली असून भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाले आहेत. विषय समिती सदस्यांच्या एकूण ८३ जागांपैकी भाजपने आपल्याकडे ४३ जागा आपल्याकडे ठेवत तब्बल ४० जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या आहेत. त्यामुळे एकमेकांवर तुटून पडणारे भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विषय समिती सदस्य निवडीवेळी मनोमिलन झाले आहे.

सातारा (Satara) जिल्हा परिषदेत बहुमत नसतानाही प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसेच विषय समिती सभापतिपदावर बाजी मारली होती. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यासह विधीमंडळातही उमटले होते. त्यातून नवे महाभारत घडले होते.

सभापती निवडीच्या वेळी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध म्हणून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने (Shivsena-NCP) निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे महायुतीमधील तीन पक्षांत सातारा जिल्हा परिषद मोठी कटुता निर्माण झालेली आहे. त्यामुळे विषय समिती सदस्यांच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा परिषदेची विशेष सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. त्या सभेत विषय समितीच्या सदस्य निवडीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने वेगवेगळे अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडी बिनविरोध होणार की मतदान प्रक्रिया राबवावी लागणार, याची उत्सुकता होती.

निवडणुकीच्या सभेपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी संवाद साधत सदस्य निवडीची प्रक्रिया बिनविरोध केली. पशुसंवर्धन समितीसाठी दोन जादा अर्ज दाखल झाले होते. मात्र ते मागे घेण्यात आले. १० समित्यांसाठी निवडण्यात येणाऱ्या ८३ सदस्यांपैकी ४३ सदस्य भाजपला तर ४० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसला देण्यात आले. या निवडी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी जाहीर केली. त्यानंतर अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

विषय समिती सदस्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले असले तरी महायुतीमधील तीनही पक्षांमधील कटुता कायम असल्याचे दिसून आले. कारण विरोधकांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी घडलेला प्रसंग पटलावर आणण्याचा प्रयत्न करताच सत्ताधाऱ्यांनी सभा संपल्याचे जाहीर करत ते सभागृहातून बाहेर गेले, त्यामुळे विरोधकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT